उरणमध्ये ट्रेलरच्या धडकेने एक ठार; कंटेनरचालक झाला फरार
By नामदेव मोरे | Published: August 18, 2023 06:29 PM2023-08-18T18:29:31+5:302023-08-18T18:29:35+5:30
पनवेल उरण रोडवर ६ जुलैला स्कुटीचा अपघात झाला होता. अपघातामध्ये भावेश पाटील हा तरूण गंभीर जखमी झाला होता.
नवी मुंबई : उरण मधील चिर्ले येथे कंटेनर मागे घेत असताना धडक लागून अब्दुल मनान या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला असून त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सेवा लॉजीस्टीक कंपनीच्या ट्रेलरवर एमएच ४६ बीएफ २३६७ काम करणारा अब्दुल मनान हा १६ ऑगस्टला चिर्ले येथील कंटेनरयार्डमध्ये माल भरण्यासाठी गेला होता. तेथे ट्रेलर उभा करून पायी जात असताना एमएच ४६ बीएफ २३६५ वरील चालक छोटु सिंग त्याच्या ताब्यातील ट्रेलर मागे घेत होता. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे ट्रेलरने अब्दुल मनान याला धडक दिली. त्याला उपचारासाठी उरण येथील इंदीरागांधी ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उरण पोलीस स्टेशनमध्ये छोटुसिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल उरण रोडवर ६ जुलैला स्कुटीचा अपघात झाला होता. अपघातामध्ये भावेश पाटील हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी प्रथम जेएनपीटी रुग्णालय व नंतर एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ११ जुलैला त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास प्रक्रिया पूर्ण करून १७ ऑगस्टला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.