महाडजवळ दोन टेम्पोंच्या धडकेत एक ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:49 PM2019-05-14T23:49:06+5:302019-05-14T23:49:42+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी महाड तालुक्यातील टोळ फाट्याजवळ दोन टेम्पो समोरासमोर धडकले. या अपघातात एक जण ठार, तर सहा प्रवासी जखमी झाले.
दासगांव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी महाड तालुक्यातील टोळ फाट्याजवळ दोन टेम्पो समोरासमोर धडकले. या अपघातात एक जण ठार, तर सहा प्रवासी जखमी झाले.
मुंबई ते महाबळेश्वरला एक टेम्पो (एमए २0 सीटी ७८७८) जात होता. मंगळवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुका हद्दीतील टोळ फाट्याजवळ आला असता, रत्नागिरी ते मुंबई आंबा वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच.0८डब्ल्यू ८४४९) यावर विरुद्ध दिशेने जाऊन आपटला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघातात मुंबई ते महाबळेश्वर जाणाऱ्या टेम्पोचालक महमद असलम खान (२४, रा. भांडुप) जागीच ठार झाला तर याच टेम्पोमधील तन्मय रावळे (१७), राकेश भांबरे (१८), अक्षय रहाटे (२0), नितीन दुबे (१८), शुभम गोसावी (१८) आणि योगेश खैर (२६, सर्व राहणार, मुंबई गोरेगाव) हे सहा प्रवासी जखमी झाले. जखमींवर दासगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र व महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अपघातानंतर एक टेम्पो रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडला. त्यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. अपघातनंतर बराच वेळ वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत होता.
दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
माणगाव : दुचाकी घसरून साईन बोर्डावर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथे झाला. विनित गंगाधर मुनलोड ( १९, सध्या रा. लोणेर) हा दुचाकीवरून मित्राला माणगांव रेल्वेस्थानकातून लोणेरेकडे घेवून येत होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती साईन बोर्डावर धडकली. यामध्ये विनितचा मृत्यू झाला तर रनविजय धर्मसिंग चव्हाण (सध्या रा. लोणेरे) हा जखमी झाला. त्याच्यावर माणगांव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद गोरेगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.