एक लाख कोटीचा सुविधा आराखडा
By admin | Published: September 9, 2015 11:50 PM2015-09-09T23:50:43+5:302015-09-09T23:50:43+5:30
येत्या पाच वर्षांत रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होणार असून येत्या पाच वर्षांत रायगड जिल्हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा झालेला असेल आणि त्याकरिता एक लाख
अलिबाग : येत्या पाच वर्षांत रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होणार असून येत्या पाच वर्षांत रायगड जिल्हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा झालेला असेल आणि त्याकरिता एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा आराखडा राज्य सरकारने तयार केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी बुधवारी येथे बोलताना दिली आहे.
येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयास पालकमंत्री मेहता यांनी भेट देवून पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री मेहता बोलत होते.
शिवरायांच्या काळातील रायगड पुन्हा उभारण्याची तब्बल १०० कोटी रुपयांची योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे. नेपथ्यकार व दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारणार असून या योजनेतील पहिल्या टप्प्यातील म्हणजे ५० कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ झाला आहे. जगभरातील एक अनन्यसाधारण ऐतिहासिक पर्यटनस्थळ रायगड किल्ला होणार असल्याचे पालकमंत्री मेहता यांनी सांगितले.
यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा गीतांजली ओक,आमदार प्रशांत ठाकूर, पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक महेश्वर देशमुख, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीष तळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)