मधुकर ठाकूर
उरण : उरण, नवीमुंबई,जेएनपीए बंदराशी जोडणाऱा आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या जासई उड्डाणपूलावरील एक मार्गिकाअभियंता दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (१५) संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.गणपती सणाच्या आधीच उड्डाणपूलावरील एकेरी मार्गिका सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
जेएनपीए -नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तानफाटा जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती.या वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान १२०० मीटर लांबीचा आणि सुमारे १०० कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.शिवमंदिराच्या अडथळ्यामुळे या उड्डाणपूलाचे काम मागील आठ वर्षांपासून रखरखडत रखडत सुरू आहे.दरम्यान या जासई उड्डाणपूलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.तर ग्रामस्थ , ग्रामपंचायतीशी वारंवार झालेल्या बैठका, चर्चेनंतर जेएनपीएने शिवमंदिर दुसरीकडे हटवून उभारण्यासाठी २५ गुंठे जमीन दिली असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांनी दिली.
त्यामुळे शिवमंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे कामही काही भाग वगळता प्रगती पथावर आहे.त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार शुक्रवारी (१५) अभियंता दिनाचे औचित्य साधून संध्याकाळपासून जासई उड्डाणपूलावरील एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.शिवमंदिराचा अडथळा दूर झाल्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे कामही युध्दपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या झाल्या नंतर या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत मिळणार आहे.गणपती सणाच्या आधीच जासई उड्डाणपूलावरील एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात आली असल्याने दररोज उरण-नवीमुंबई दरम्यान प्रवास करणारे प्रवासी, वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे.