एक महिन्याच्या बाळाच्या छोट्या आतड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:04 AM2018-12-28T05:04:54+5:302018-12-28T05:05:05+5:30
कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे.
अलिबाग : कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे.
या मुलास जन्मल्यापासून दूध वा काहीही प्यायल्यावर त्यास लगेच उलटी होत होती. मुलाचे वजनदेखील कमी होत होते. पालकांनी या मुलास अलिबागमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्याकडे तपासणीकरिता नेले. मुलाच्या जठरातून छोट्या आतड्याकडे येणारा मार्ग जन्मत: छोटा असल्याचे प्राथमिक निदान त्यांनी केले. या बाबत खातरजमा करण्याकरिता डॉ. चांदोरकर यांनी रेडिओलॉजिस्ट डॉ. अनिता शेटकर यांच्याकडे सोनोग्राफीकरिता पाठविले. सोनोग्राफीअंती डॉ. अनिता
शेटकर यांनी केलेले प्राथमिक
निदान खात्रिशीर असल्याचे निश्चित केले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी तत्काळ ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पालकांना या बाबत सांगून बुधवारी डॉ. तिवारी यांनी ही अत्यंत जिकरीची शस्त्रक्रिया प्रत्यक्षात आणली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मुलगा शुद्धीवर आला आणि पालकांसह सर्व डॉक्टर्सदेखील सुखावून गेले. मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यावर खर्च आणि खूप फिरावे लागले असते. नातेवाइकांचे खूप हाल होतात, या सर्वाविना आणि सर्व डॉक्टरांच्या सहकार्यामुळे आमच्या मुलाची शस्त्रक्रिया येथेच होऊ शकली, या बाबत बालकाच्या पालकांनी आनंद व्यक्त करून डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
भूल देऊन शस्त्रक्रिया जिकरीची
अवघ्या एक महिन्याच्या बाळाला भूल देऊन शस्त्रक्रिया करणे अत्यंत जिकरीचे असते. मात्र, या चौघा डॉक्टरांचा अनुभव आणि सांघिक प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकले आहे. बालकाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन ही शस्त्रक्रिया अत्यल्प खर्चात करण्यात आली.