एका रात्रीत चार घरफोड्या, श्रीवर्धनमध्ये नागरिक भयभीत : पोलिसांपुढे चोरांचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:20 AM2017-10-12T02:20:41+5:302017-10-12T02:20:56+5:30
श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली.
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली. एका ठिकाणी चोरांनी किरकोळ रोख रक्कम लांबविल्याचे समजते, तर याआधी शिस्ते येथील दिलीप बबन भायदे यांच्या घरीदेखील चोरांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने पोलिसांपुढे आता चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
मंगळवारी मध्यरात्री बोर्ली पंचतन येथील एसटी स्टँड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील मुख्य सभागृहाचे व कार्यालयाचे कुलुप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला; परंतु यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही, त्यानंतर चोरांनी जवळील समतानगर येथील प्रभाकर खोपरे, काशिनाथ पेडणेकर, अरुण करंदेकर यांच्या राहत्या बंद घराचे कुलुप तोडून चोरांनी आतील कपाटांतून काही रक्कम किंवा घबाड मिळते का यासाठी प्रयत्न केले; परंतु फक्त काशिनाथ पेडणेकर यांच्या घरातील कपाटातून ७ हजार रुपये चोरांच्या हाती लागल्याचे समजते. यापूर्वी म्हणजेच, ९ आॅक्टोबर रोजी दुपारी १२च्या दरम्यान शिस्ते येथील दिलीप भायदे हे काही खरेदीसाठी बाजारामध्ये आले असता व दरवाजा अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरांनी घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.