विधानसभेचा सामना एकतर्फी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:43 PM2019-10-12T23:43:02+5:302019-10-12T23:43:34+5:30
देवेंद्र फडणवीस। पेणमधील पाणीप्रश्न सोडविणार असल्याची दिली ग्वाही #MaharashshtraElection2019
लोकमत न्यूज नेटवर्क
पेण : राज्यातील विधानसभेचा सामना एकतर्फी होणार, यात दुमत नाही. राजकीय मैदानात तगडे विरोधक नसल्याने मज्जाच येत नाही. निवडणुकीनंतर पेणच्या सर्वांगीण विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिता करणार असून, पेण-वाशी, खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये व्यक्त केला.
१९१ पेण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवि पाटील यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी मुख्यमंत्री मार्गदर्शन करीत होते. एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाटासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात व्यासपीठावर आरपीआयचे राष्टÑीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंडे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवानेते वैकुंठ पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, शिवसेनेचे जि. प. सदस्य किशोर जैन आदी उपस्थित होते.
पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग येऊन हा जिल्हा रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल; परंतु याचबरोबर येथील पर्यावरणाला थोडाही धक्का न लावता पर्यटन व उद्योगातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीचा समन्वय साधून पुढील पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबवायचा असल्याचा उल्लेख या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, त्यांच्या खात्यावर थेट अनुदान, शेतमालाला हमीभाव, बचतगटांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठा आरक्षण, धनगरांसाठी आरक्षण, आरोग्य विमा योजना, मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय, त्यातून फिशिंग जेटी, अवजारांसाठी कर्ज, ओबीसींसाठी तीन हजार कोटींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, पाच वर्षांत विकासाच्या विविध योजना राबवून सरकारने सामान्य जनतेची मने जिंकली आहेत. पेण तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची कामे रवि पाटील यांच्याच माध्यमातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, रवि पाटील यांच्यावर कविता केली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, नरेश गावंड, भाजपचे गंगाधर पाटील, अॅड. महेश मोहिते यांचीही भाषणे झाली.