म्हसळा : देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे.
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरूप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरुवात होत आहे. त्याच माध्यमातून म्हसळा नगरपंचायतीला १४व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याचबरोबर शहरी, तसेच ग्रामीण भागातील भिंतींवर स्वच्छतेचा संदेश, तसेच चित्र रंगविण्यात आले आहे.
या निधीच्या अंर्तगत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अभियानास वाढता प्रतिसाद मिळावा, म्हणून व स्वत:पासून सुरुवात व्हावी, या उद्देशाने घर स्वच्छ राहिले, तर गाव स्वच्छ राहिल, गाव स्वच्छ राहिले, तर शहर स्वच्छ राहिल, शहर स्वच्छ राहिले, तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे, या विषयी नगरपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
संपूर्ण शहरासह नगरपंचायत हद्दींत भिंती रंगविणे, फ्लेक्स लावणे या विविध कामांर्तगत फार मोठा खर्च करण्यात आला आहे. ओला-सुका कचऱ्याचे कंपार्टमेंट असेलेले दोन टाटा टेम्पो, कचरा क्रश करण्याचे मशीन नगरपंचायतीने घेतली आहेत. याचबरोबर, स्वच्छता व आरोग्य सुधारण्यासाठी शहरांतील आठ विहिरींची पूर्ण स्वच्छ करून दुरुस्ती करण्यात आली आहे.
कठडा उंचावणे, परिसर स्वच्छ करणे, अशी कामे याच निधीतून करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत अर्थ विभागातून सांगण्यात आले.संपूर्ण शहरांत स्वच्छतेबाबत जनजागृती करत असतानाच, यापुढे दरदिवशी निर्माण होणाºया घनकचºयाची आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याबाबत नगराध्यक्षा जयश्री कापरे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योजना तयार करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. म्हसळा शहरांत स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, हे पहिले काम असल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे. स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे. भांडवली खर्च, आॅपरेशन आणि देखभाल यासाठी खासगी पास्को, दिघी पोर्ट किंवा अन्य संस्थांच्या सहभागाने वातावरण निर्माण करून शहरात नागरी स्वच्छतेचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार, या प्रकल्पासाठी शहरातील नगरपंचायतीच्या मालकीची जागा शोधणे सुरू आहे.- जयश्री चंद्रकांत कापरे, नगराध्यक्षा.