एक हजार मूर्ती गुजरातमध्ये रवाना
By admin | Published: September 14, 2015 04:05 AM2015-09-14T04:05:59+5:302015-09-14T04:05:59+5:30
महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायाची परंपरा पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आजही सुरू आहे
महाड : महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायाची परंपरा पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आजही सुरू आहे. तालुक्यातील एकूण वीस गणेश मूर्तिकारांच्या बहुतांशी कुटुंबांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. या कारखान्यांमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक मूर्ती या प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये तर ३० टक्के मूर्ती या शाडूच्या मातीने बनवल्या जातात.
महाड तालुक्यातील कोंझर येथील सदानंद देवगिरकर यांच्या कारखान्यात अडीच ते तीन हजार मूर्ती बनवल्या जातात त्यांचे हे काम संपूर्ण वर्षभर सुरुच असते. देवगिरकर यांच्या कारखान्यात बनवलेल्या सातशे मूर्ती दरवर्षी गुजरात राज्यातील सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी निर्यात केल्या जातात. विशेष म्हणजे गुजरातमध्ये पाठवण्यात येणाऱ्या या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात या मूर्ती गुजरातमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सदानंद देवगिरकर यांनी दिली. मूर्तीची आकर्षक आखणी व मनमोहक रंगकामामुळे गुजरातमध्ये गणेश मूर्तींंना मागणी आहे.