Amit Shah ( Marathi News ) : "स्वत:ला आलमगीर म्हणवणारा इथेच महाराष्ट्रात पराभूत झाला आणि इथेच त्याची कबर खोदली. मी महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करायला आलोय. शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मी आतापर्यंत अनेक युगपुरुषांचे जीनव चरित्र वाचले आहेत. पण, प्रचंड इच्छाशक्ती, धाडस, अकल्पनीय रणनिती आणि रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून अपराजित सेनेची निर्मीती केली. हे शिवछत्रपतींशिवाय कोणीच केलेले नाही. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, ना त्यांच्यासोबत भाग्य होते, सेना नव्हती एक मुलगा धाडसाच्या जीवावर पूर्ण देशाला स्वराज्यचा मंत्र देऊन गेले. बघता बघता त्यांनी २०० वर्षे असलेल्या मुघलशाहीला पराभूत करुन देशाला स्वतंत्र करण्याचे काम केले, असंही अमित शाह म्हणाले.
"ज्यावेळी अटकपर्यंत मावळ्यांची सेना पोहोचली, बंगाल, तामिळनाडूपर्यंत सेना पोहोचली तेव्हा सगळ्यांना आपला देश वाचला असे वाटले. आमची भाषा, संस्कृती वाचली. आज आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा देश नंबर एकला असणार आहे, असंही शाह म्हणाले.
"आलमगीरची कबर महाराष्ट्रातच..."
अमित शाह म्हणाले, जिजाऊंनी बाल शिवाजी यांच्यावर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी त्या संस्काराचा वटवृक्ष बनवला आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी. शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब जोपर्यंत जीवंत राहिला तोपर्यंत ते त्याच्याविरोधात लढत राहिले. स्वत:ला आलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराभूत होऊन इथेच त्याची कबर बांधली, असंही अमित शाह म्हणाले.
अमित शाहांसमोर उदयनराजेंच्या मोठ्या मागण्या
"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्ष बेल मिळाली नाही पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होत आहे, यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना व्हावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.