मधुकर ठाकूर -
उरण - बोकडवीरा-उरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायु विद्युत केंद्रातील (जीटीपीएस) वीज निर्मितीच्या ए-२ युनिटमधील स्टीम बॉयलरमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. यामुळे युनिट दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे. या बंद पडलेल्या युनिटमुळे वीजनिर्मिती केंद्राची दररोजची क्षमता १०० मेगावॉटने घटली आहे. दरम्यान अभियंत्याच्या मृत्यूनंतर सोमवारी (१०) कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीररित्या होरपळलेल्या टेक्निशियन कुंदन पाटील यांच्यावर बर्न्स इस्पीतळात उपचार सुरू असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.
दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या प्रसंगी झालेल्या चर्चेत मृतांच्या वारसांना कायम स्वरुपी नोकरी, ५० लाखांची आर्थिक नुकसान भरपाई व भविष्यात अशा अप्रिय घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास कामगाराचा मृतदेहच प्रवेशद्वारावर ठेवण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
चार ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागण्यांवर सोमवारी (१०) सकाळपासूनच जीटीपीएस प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात आठ तास मॅरेथॉन बैठक सुरू होती.मागण्या निर्माण बसत नसल्याने त्यांची पुर्तता अशक्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने मागण्यांचा तिढा कायम असल्याचे न्हावा शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.
तरीही ग्रामस्थ मात्र अद्यापही प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर गर्दी करुन आहेत.मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार शासनालाच आहेत. वरिष्ठांना प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती उरण जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.
दरम्यान उरणमधील वायु विद्युत केंद्रातील बॉयलरमध्ये रविवारी (९) झालेल्या स्फोटानंतर वीज निर्मितीच्या संचाचे काम बंद पडले आहे.बंद पडलेल्या संचाची तांत्रिक तपासणी, दुरुस्ती नंतरच वीजनिर्मितीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
या दरम्यान दररोजच्या वीजनिर्मितीचे काम बंद राहणार आहे.त्यामुळे दररोज १०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होणार आहे. सध्या उरणच्या या वायु विद्युत केंद्रात ३५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.