ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:32 AM2023-09-09T06:32:46+5:302023-09-09T06:33:10+5:30
मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले.
उरण : ओएनजीसीच्या उरण प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली. यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल नाल्यातून थेट समुद्रात पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे. पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे. परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑइलचे थर मशीन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरून गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युद्धपातळीवर सुरू केले आहे.
मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले. ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर, पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑइलचे जाड थर कामगार लावून ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत. मात्र, नाल्यातून वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहोचल्याने पाण्यावर तवंग दिसू लागले आहेत.
तेल गळतीचे प्रकार सुरूच
ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधी तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत. उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारशी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.
प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हॉल्व्ह लीकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातून थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे. गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. समुद्रात जाण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने, परिसरातील मासेमारी, शेती आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
- सुभोजीत बोस, मुख्य प्रकल्प अधिकारी.