ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:37 AM2019-03-25T02:37:27+5:302019-03-25T02:37:39+5:30
हवामानातील बदलामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मासळीचा दुष्काळ पडल्याने मासेमारी करता न आल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
- आविष्कार देसाई
अलिबाग : हवामानातील बदलामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मासळीचा दुष्काळ पडल्याने मासेमारी करता न आल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. मासळीचा हंगाम आता सुरू होत असतानाच ओएनजीसी कंपनीने अरबी समुद्रामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याने मासेमारी व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ओएनजीसी कंपनीने सुरू केलेले सर्वेक्षण बंद केले नाही तर हजारोंच्या संख्येने मासेमारी बोटी सर्वेक्षणाच्या ठिकाणी हल्लाबोल करतील असा संतप्त इशारा रायगड जिल्हा मच्छीमार संघाने दिला आहे. ओएनजीसी आणि मच्छीमार संघटना आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने नजीकच्या कालावधीत संघर्ष अटळ असल्याचे दिसून येते.
अरबी समुद्रात ओएनजीसी कंपनीमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्ह्यातील विविध मच्छीमार सोसायट्यांना पाठविण्यात आले. तत्पूर्वी रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे ओएनजीसीने मच्छीमारांना कळवले होते. त्याचप्रमाणे सर्वेक्षणाच्या कालावधीमध्ये मासेमारी करण्यापासून कोणालाच रोखण्यात येणार नाही, असेही सांगण्यात आले होते. ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे त्याठिकाणापासून सर्वेक्षणाच्या सभोवतालच्या बाजूंनी पाच समुद्री मैल अंतर ठेवून मासेमारी करण्याच्या सूचना मासेमारी बोटीच्या मालकांना दिल्या आहेत. सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने या हालचाली असल्या तरी ऐन मासेमारीच्या हंगामामध्येच हे सर्वेक्षण होणार असल्याने मासेमारी करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मासेमारी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने या सर्वेक्षणाला विरोध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे चिटणीस उल्हास वाटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ओएनजीसी करत असलेल्या सर्वेक्षणाचे ठिकाण हे मासेमारी करणाऱ्यांचा प्रामुख्याने फिशिंग बेल्ट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळी मिळते. त्याचप्रमाणे याच ठिकाणी पकडलेली सुमारे ६० टक्के मासळी निर्यात केली जाते. त्यामुळे रोजचे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनही नष्ट होण्याची भीती वाटकरे यांनी व्यक्त करून आर्थिक नुकसानीची भयानता स्पष्ट केली. आर्थिक नुकसान भरपाईबाबत अद्याप काहीच विचार केलेला नाही. त्यामुळे असे सर्वेक्षण काय कामाचे जे कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय आणून त्यांना उद्ध्वस्त करणार असेल. त्यामुळे मासेमारी व्यावसायिकांमध्ये असंतोष खदखदत असल्याने त्यांनी आतापर्यंत मासेमारी संघटनेची स्वतंत्र आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक संचालक यांच्या सोबत बैठक झाली आहे. याच प्रश्नावर २७ मार्च रोजी सहायक संचालक यांच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला ओएनजीसीचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले.
आर्थिक नुकसान
- हे सर्वेक्षण किती नॉटिकल मैलामध्ये करणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख नाही. २४ फेबु्रवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा हा मच्छीमारांचा मासेमारी करण्याचा अखेरचा हंगाम असतो.
- नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मासेमारी झाली नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. आता मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे; परंतु ओएनजीसीचे सर्वेक्षण आडवे आले आहे. चोवीस तास केल्या जाणाºया सर्वेक्षणांमध्ये मासे मिळणार नसल्याने आर्थिक नुकसान होणार असल्याने मासेमारी करणारे व्यावसायिक, विविध सोसायट्या हवालदिल झाल्या आहेत.
असे होणार सर्वेक्षण
रायगड जिल्ह्याच्या समुद्रात सुमारे ३० वाव अंतरावर ओएनजीसी कंपनीमार्फत एसीएएक्सप्लोरेशन इन्क कंपनी- हवेला फोर्च्युन, सॉव्हरिगिन-२, पॅसिफिक फाइन्डर, नेपच्युन नैद आणि मॅक फिनिक्स या पाच सर्वेक्षण जहाजांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
हवेला फोर्च्युन, सॉव्हरिगिन -२ ही जहाजे समुद्रात २५ रोप लाइन टाकणार आहेत. प्रत्येक रोप लाइनला नोड जोडलेले असणार आहेत. प्रत्येक नोड प्रत्येक लाइनपासून २०० मीटर अंतर ठेवून टाकण्यात येणार आहे. या दोन लाइनमध्ये एक बोया जोडला जाणार आहे.
हा बोया समुद्र तळाशी राहणार आहे. वेळ प्रसंगी तो बोया रेडिओ सिग्नल देऊन तळापासून पाण्यावर आणला जाणार आहे. पॅसिफिक फाईन्डर, नेपच्युन नैद ही जहाजे पाच ते सहा समुद्र मैल अंतरात २४ तास फिरत राहणार आहेत.
सॉव्हरिगिन-२ वरून दोन कोआॅर्डिनेटर व्हीएचएफ रेडिओद्वारा मच्छीमार बोटीबरोबर २४ तास संपर्कात राहणार आहेत. मासेमारी नौकांसह अन्य काही वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी चार स्टील टग आणि १० सिलिंग बोट २४ तास गस्त घालून मासेमारी करणाºयांना मार्गदर्शन करणार आहेत.