एमजेपीला आली जाग, ओएनजीसी रेल्वे पुलाच्या पाणीगळतीचे काम युद्धपातळीवर हाती
By वैभव गायकर | Published: October 30, 2023 05:22 PM2023-10-30T17:22:12+5:302023-10-30T17:22:28+5:30
भोकरपाडा ते कळंबोली अशी ही 19 किमीची जलवाहिनी आहे. 40 वर्ष जुनी ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे.
पनवेल - जुन्या मुंबई पुणे मार्गावर ओएनजीसी रेल्वे पुलाखाली कित्येक दिवसांपासून सुरु असलेली पाणी गळती थांबविण्याचे काम अखेर एमजेपी प्रशासनाने दि.30 रोजी हाती घेतले आहे.सोशल मोडिया तसेच सर्वत्रच याठिकाणच्या गळतीचे फोटो व्हायरल होत असल्याने पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी अखेर या जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.
भोकरपाडा ते कळंबोली अशी ही 19 किमीची जलवाहिनी आहे.40 वर्ष जुनी ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे.संपुर्ण जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम एकीकडे सुरु असताना सद्यस्थितीत लागलेली गळती थांबविण्याचे मोठे आव्हान एमजीएपी प्रशासनासमोर आहे.याकरिताच दि.30 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात आल्याने एमजेपीच्या माध्यमातुन शटडाऊन पुकारण्यात आले आहे.
यामुळे पनवेल शहर,कळंबोली,नवीन पनवेल,तसेचकरंजाडे,डेरवली,वडघर,विचुंबे,उसर्ली,बेलवली,वारदोली,नांदगाव,कुडावे आदी गावांना या शटडाउनचा फटका बसणार आहे.याकामासाठी सुमारे 140 ते 150 एमजेपीचे कर्मचारी आणि अभियंते याकामासाठी गुंतले आहेत.वडघर,कोलाखे तसेच ओएनजीसी रेल्वे उड्डाणपुलाखाली वेगवगेळ्या टीम याकरिता कार्यरत असल्याची माहिती एमजेपीचे उपअभियंता के बी पाटील यांनी दिली.याकरिता 25 एचपीचे पंप याठिकाणी साचलेले पाणी उपसा करण्यासाठी लावण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.सोमवारच्या शटडाऊन मुळे 12 तास लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले.
वायर्सचा विळखा
एमजीपीने हाती घेतलेल्या कामाला विविध अडथळे येत आहेत.दुरुस्तीच्या ठिकाणी वेल्डिंग करण्यापुर्वी जलवाहिनीच्या पूर्ण परिसर कोरडा करणे गरजेचे असताना याठिकाणी विविध वायर्सचा विळखा पडला आहे.यामध्ये गॅस,टेलिफोन तसेच केबल चा समावेश आहे.
एमजेपीची संपुर्ण जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम सुरु आहे.मात्र हे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा काळावधी लोटणार आहे.तत्पूर्वी 40 वर्ष जुन्या या जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे.तीन ठिकाणची गळती थांबवण्यासाठी किमान 150 कर्मचारी, अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.
- के बी पाटील (उपअभियंता,एमजेपी पनवेल)