लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर,पनवेल: राज्य सरकार आणि प्रांतधिकाऱ्यांविरोधात पनवेल संघर्ष समिती प्रेरित कर्नाळा बँक ठेवीदारांनी केलेली निदर्शने अंशत: यशस्वी झाले. संघर्ष समितीने इशारा देताच प्रांतधिकाऱ्यांनी दि.11 रोजी सोमवारी न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतले.दि.12 रोजी कर्नाळा बँक ठेवीदारांकरिता पनवेल संघर्ष समितीने राज्य सरकार आणि पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्याविरोधात शेकडो ठेवीदार आणि संघर्ष समितीने निदर्शन केली.
समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक दिली. तेव्हा मुंडके उपस्थित राहिले नाहीत. मात्र, नायब तहसीलदार श्रीकांत शेलार आणि नायब तहसीलदार डॉ. सुनील जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चौघुले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत कांतीलाल कडू यांच्याकडे ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर केल्याची प्रत यावेळी शिष्टमंडळाला दिली.
तातडीने ऑफलाईन प्रतिज्ञापत्र एमपीआयडी न्यायालयात सादर करताना सरकारी वकीलांचे साहाय्य करावे, तसेच आठ दिवसात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करावे. तसे न केल्यास ठेवीदार सामूहिक आत्मदहन करतील आणि त्याची जबाबदारी म्हणून प्रांताधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा ईशारा कांतीलाल कडू यांनी बैठकी दिला. ठेवीदारांच्या विरोधात स्थानिक आमदार, शेकाप नेते, राज्य सरकार आणि सरकारी अधिकारी काम करीत असल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्यास उशीर होत आहे.याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया कांतीलाल कडू यांनी यावेळी दिली.