रोहा : सायबर गुन्ह्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आॅनलाइनद्वारे आधार कार्ड, बँक खाते नंबर, एटीएम नंबर मागून परस्पर बँकांतून पैसे काढले जातात. रायगडसह रोहा तालुक्यात आॅनलाइनद्वारे फसविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारेच रोहा येथील महिलेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून तब्बल ७९ हजार ३८९ रुपये काढले. रोहा ग्रामीण भागातील तीन ते चार ग्राहकांची फसवणूक झाली आहे.मोबाइलवरून फोन करून आपला त्या बँकेतील खाते लवकरच ब्लॉक होणार आहे. त्यासाठी प्लीज अकाऊंट नंबर सांगा, एटीएम नंबर सांगता का ? असे बोलून फसवणूक केली जात आहे आणि अशा कित्येक भूलथापांना अनेक जण बळी पडत आहेत. अशा विविध घटना चर्चेत असतानाच वरचा मोहल्ला रोहा येथील दिलनवाज जंजिरकर यांना बांद्रा मुंबई येथील आॅनलाइन सर्व्हिस सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली. त्यांच्या बँक खात्याबाबत आणि एटीएम नंबरची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील ७९ हजार ३८९ रुपये लंपास केले. दिलनवाज सुहेल जंजिरकर यांना मोबाइलवर मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात तक्र ार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेचा पो. निरीक्षक संजय धुमाळ तपास करीत आहेत. (वार्ताहर)
आॅनलाइन फसवणुकीचा रोह््यातील महिलेला फटका
By admin | Published: February 02, 2016 2:04 AM