- आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील फक्त एकच उमेदवार उच्चशिक्षित आहे. एका उमेदवाराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. चौदावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एक उमेदवार डिप्लोमा इंजिनीअर, बारावी पास असणारे चार, दहावी शिकलेले तीन उमेदवार आहेत. सातवी आणि नववी पास असणारे प्रत्येकी एक उमेदवार आहेत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. या प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत असली तरी बसप, वंचित बहुजन आघाडी, लोकभारती, प्रहार जनशक्ती पक्ष आणि सहा अपक्ष उमेदवार असे एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापचे उमेदवार सुभाष पाटील, आनंद नाईक (अपक्ष), चिंतामण पाटील (अपक्ष), श्रीनिवास मट्टपर्ती (लोकभारती) या चार उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झालेले आहे.
लोकभारती पक्षाचे संदीप सारंग, प्रहार जनशक्तीच्या हेमलता पाटील हे दोन उमेदवार दहावीपर्यंत शिकले आहेत. शिवसेनेच महेंद्र दळवी, अशरफ घट्टे (अपक्ष) हे नववीपर्यंत शिकले आहेत. अपक्ष उमेदवार दिनकर खरीवले यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे रविकांत पेरेकराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे, तर बसपचे अनिल गायकवाड यांनी एसवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. अन्य काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आहे. या सर्व उमेदवारांवर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांनी मात केली आहे. या मतदारसंघातील उच्चशिक्षित महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीएसस्सी एलएलबीपर्यंत झाले आहे.
अलिबाग मतदारसंघातील उमेदवारांवर नजर टाकल्यावर अद्यापही उच्चशिक्षित उमेदवार राजकारणात येत नसल्याचे चित्र त्यानिमित्ताने समोर येते. राजकीय वरदहस्त असला की राजकारणातील प्रवेश सुकर ठरतो. मात्र, पुढील मेहनत स्वत:च घ्यावी लागते. उमेदवारी देताना शिक्षणाचा निकष अद्यापही लावला जात नसल्याचे दिसून येते. याचाच अर्थ राजकारणात शिक्षणाला विशेष महत्त्व नसल्याचेच अधोरेखित होते.शिक्षण व राजकीय अनुभवाची सांगड महत्त्वाचीकाही उमेदवारांकडे शिक्षण नसेल; परंतु राजकीय जाण आहे. तर काही उमेदवारांकडे दोन्ही गुण असू शकतात. जनसामान्यांतील त्यांची प्रतिमा, पक्ष संघटनावर असेलेली पकड, पक्ष नेतृत्वाचा उमेदवारावर असलेला विश्वास, राजकीय डावपेचाची जाण, असे सर्व निकष लावूनच त्यांना उमेदवारी मिळाली असेल. गाठीशी असलेले शिक्षण आणि राजकीय अनुभव यांची सांगड घालून हे सर्व उमेदवार कशा प्र्रकारे निवडणुकीलाजातात आणि विजयी कोण होतो? हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.