रंगभूषेत रंगले अवघे कुटुंब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 11:48 PM2020-05-01T23:48:54+5:302020-05-01T23:53:45+5:30
सावंत कुटुंबीयांनी गाजवली हिंदी मालिका, सीनेसृष्टी : ‘रामायण’फेम गोपाळ सावंत होते मेरूमणी
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : अवघे कुटुंबच एखाद्या कलेला वाहून घेत असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. रंगभूषा या पडद्याआडच्या महत्त्वपूर्ण कलेसाठी एका कुटुंबाने पिढ्यानपिढ्या योगदान दिले आहे. ते कुटुंब म्हणजे, सध्या दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिकेच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशझोतात आलेले प्रख्यात रंगभूषाकार दिवंगत गोपाळ सावंत यांचे होय. त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत व उत्तम सावंत यांनी मेकअपमन म्हणून, तर कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून लौकिक मिळवित हा वारसा पुढे नेला.
‘लोकमत’शी बोलताना सूर्यकांत सावंत म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महाडमधील विनेर हे सावंत कुटुंबाचे मूळ स्थान. हे कुटुंब मुंबईत रवाना झाले. १९६0च्या दशकापासून हिंदीतील रंगभूषेच्या क्षेत्रात गोपाळ सावंत यांनी आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. तत्पूर्वी त्यांनी नाट्यक्षेत्रातही मुशाफिरी केली. त्यांचे बंधू सखाराम व रामचंद्र अनुक्रमे माला सिन्हा व रेखा यांचे पर्सनल मेकअपमन म्हणून कार्यरत होते. सखाराम यांच्यासोबत १६९३पासून गोपाळ सावंत यांनी सहरंगभूषाकार म्हणून काम सुरू केले. पारसमणी (१९६३), सरस्वतीचंद्र (१९६८), सच्चाझुठा (१९७0), ललकार (१९७२) हे चित्रपट करत असताना ‘हारजीत’ चित्रपटासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून पदार्पण केले. रामानंद सागर यांच्या ‘गीत’ चित्रपटासाठी या तिन्ही भावांनी एकत्र काम केले. १९७५मध्ये राधा सलुजा या अभिनेत्रीसोबत त्यांनी पर्सनल मेकअपमन म्हणून काम सुरू केले.
१९८0मध्ये ज्येष्ठ सुपुत्र सूर्यकांत यांना त्यांनी रंगभूषा क्षेत्रात आणले. १९८४मध्ये रामानंद सागर यांनी गोपाळ सावंत यांना बोलावणे पाठविले. सागर यांच्या बंगल्यावर ‘रामायण’साठी कलाकारांची निवड होत होती. त्यात कलाकारांच्या ‘लुक टेस्ट’साठी महत्त्वपूर्ण जबाबदारी गोपाळ सावंत यांनी पार पाडली. १९८६मध्ये नटराज स्टुडिओचा सेट लावून ‘रामायण’चा मुहूर्त करण्यात आला. मात्र जागेअभावी उंबरगाव येथील वृंदावन स्टुडिओत शुटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे गोपाळ सावंत यांनी आपल्या हातातील जादूची अदाकारी दाखवून दिली. वानरसेनेतील विरांचे मुखवटे व रंगभूषा करण्याचे किचकट काम ते लिलया करत असत. ‘रामायण’चा ‘चेहरा’ म्हणून गोपाळ सावंत यांच्याकडे बघितले जाई.
पुढे उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकेसाठी त्यांनी काम केले. बडोदा येथील लक्ष्मी स्टुडिओमध्ये अलिफ लैला, सिंदबाद, जय गंगामैया या मालिकांसाठी त्यांनी काम केले. १९९५ मध्ये गोपाळ सावंत यांचे निधन झाले व हिंदी सिने, मालिका क्षेत्रातील एक तारा निखळला.
पुढे सागर आर्ट कंपनीत प्रमुख रंगभूषाकार म्हणून त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत रुजू झाले. आँखे, हातीम, पृथ्वीराज चौहान, धरमवीर, झी टीव्हीवरील साईबाबा, रामायण, स्वामी नारायण या मालिकांसाठी त्यांनी काम केले. उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकांमध्ये गोपाळ सावंत यांची कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून काम केले. दुसरा मुलगा उत्तम सावंत यांनीही श्रीकृष्ण मालिकेपासून सहरंगभूषाकार म्हणून काम केले.
सिने क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांच्या तुलनेत रंगभूषा हा प्रांत तसा दुर्लक्षित राहिला आहे. मात्र ‘रामायण’च्या निमित्ताने या क्षेत्रासाठी वाहून घेणा-या सावंत कुटुंबीयांचा परिचय रसिकांना झाला.