महाड एमआयडीसीत घनकचरा उघड्यावर; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:24 AM2020-01-03T00:24:03+5:302020-01-03T00:24:06+5:30
मोकळ्या जागेत टाकला रासायनिक कचरा
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक परिसरातील श्रीहरी केमिकल एक्स्पोर्ट या कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने रासायनिक घनकचरा टाकला आहे. हा घनकचरा रात्रीच्या सुमारास टाकला असल्याचे शेजारील कंपनी प्रशासनाने सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
महाड एमआयडीसीमधील मोकळ्या जागांचा प्रश्न गेली अनेक वर्षे खितपत पडला असून, या मोकळ्या जागा कचऱ्याचे डम्पिंग सेंटर बनले आहेत. मात्र, याकडे प्रदूषण मंडळ आणि एमआयडीसी विभागाचेही कायम दुर्लक्ष राहिले आहे. शनिवारी रात्री महाड एमआयडीसीमधील श्रीहरी केमिकलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने रासायनिक घनकचरा टाकला आहे. हा घनकचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत शेजारील कंपनी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळवले आहे. टाकण्यात आलेल्या घनकचºयात जुन्या प्लॉटवरील साचलेला कचरा, रासायनिक पदार्थांच्या पिशव्या, प्लास्टिक कचरा आदीचा समावेश आहे. या कचºयामुळे मोकळ्या जागेत फिरणाºया पाळीव जनावरांचे आणि मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा अद्याप उचलला गेला नसून, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या उपविभागीय कार्यालयाकडूनही अद्याप कोणताच शोध घेण्यात आलेला नाही.
देशभरात प्लास्टिकबाबत कठोर पावले उचलली गेली आहेत. मात्र, याबाबत औद्योगिक क्षेत्रात मात्र गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. कारखान्यातील प्लास्टिक कचरा कंपनीच्या आवाराबाहेर टाकला जात आहे. महाड एमआयडीसीमधील अनेक रस्त्यांलगत गटारात रसायनाच्या प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. याबाबतही प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा महाड एमआयडीसी प्रशासन लक्ष देत नाही. या कचºयामधील रसायनिक पावडरही गटारातील पाण्यात मिसळली जाते. यातून होणाºया प्रदूषणावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
महाड एमआयडीसीमधील मोकळ्या जागा कारखान्याकरिता संपादित करण्यात आल्या आहेत. तर काही मोकळ्या जागा या कंपन्या बंद झाल्यामुळे तशाच पडून आहेत.
या जागा एमआयडीसीने वास्तविक ताब्यात घेणे आवश्यक होते. मात्र, बंद कारखान्यांच्या जागा तशाच पडून राहिल्याने रासायनिक घनकचरा आणि अन्य कचरा या जागांमध्ये तसेच बंद कारखान्यात तसाच पडून आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा रासायनिक घनकचरा बंद कारखान्यात पडून आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ठोस कारवाई करत नाही. शिवाय, याबाबत बंद कारखाना प्रशासन किंवा मालकदेखील दाद देत नसल्याचे दिसून येत आहे.
श्रीहरी केमिकलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या प्लॉटवर टाकलेला रासायनिक घनकचरा कोणत्या तरी जुन्या प्लॉटवरील कचरा आहे. शोध घेऊन कारवाई केली जाईल.
- जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ