रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:49 AM2018-04-18T01:49:59+5:302018-04-18T01:49:59+5:30
धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला.
अलिबाग : धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला. दरम्यान, दोन बोटी त्यावरील दोन सक्शन पंपासह पेटवून देऊन खाडीतच भस्मसात करून टाकण्यात आल्याची माहिती अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दिली आहे.
बोटींची किंमत सुमारे ३२ लाख रु पये आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत अलिबाग तहसील कार्यक्षेत्रात ५१ प्रकरणांत १४ लाख ९७ रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १५ बोटी भस्मसात करण्यात आल्याचे संकपाळ यांनी सांगितले.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील बेकायदा रेती (वाळू) उत्खननावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अलिबाग व पेण तालुक्यांच्या सीमेवरील धरमतर खाडीत अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी थेट बोटीतून खाडीमध्ये उतरुन मंगळवारी सकाळी बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेतीसम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
३ बार्ज, २ सक्शन पंप भस्मसात
बेकायदा रेती विरोधातील या धडक कारवाईची माहिती रेतीसम्राटांना लागल्यावर त्यांनी बोटचालकांना बोटी धरमतर खाडीबाहेर नेण्याच्या सूचना दिल्या. परिणामी, पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना मंगळवारी धरमतर खाडीच्या पेण तालुका क्षेत्रातील मोहिमेदरम्यान बेकायदा रेती उत्खनन करणाºया बोटी निष्पन्न होऊ शकल्या नाहीत.
शनिवारी धरमतर खाडीत केलेल्या मोहिमेत उत्खनन करणारे २१ लाखांचे तीन बार्ज आणि त्यावरील दोन सक्शन पंप जप्त करून त्यांना खाडीतच आग लावण्यात आल्याचे तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी जांभूळटेप गावच्या हद्दीत कारवाई करून जप्त केलेली ५५ हजार रुपये किमतीची १३ ब्रास रेती रातोरात चोरी केल्याप्रकरणी नागोठणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.