अलिबाग : राज्य सरकारने कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवण्याला तत्वत: मंजुरी दिली असली, तरी कोकणात पुढील ५० वर्षांत वाढणारे नागरीकरण, उद्योग आणि शेती यांना लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेतली पाहिजे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
कोकणात पाणी अडवण्यासाठी आधी धरणे उभारली पाहिजेत. त्यानंतर स्थानिक पातळीवरील गरज प्रथम लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरच अतिरिक्त पाणी हे वळवळणे गरजेचे आहे, अन्यथा तो कोकणच्या जनतेवर तो अन्याय होईल असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर १०० दिवसांचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.रायगड जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर करावे. त्यासाठी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उर्वरित जागेवर ते उभारण्यात यावे असा प्रस्ताव सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये ओएनजीसी येथे एकच केंद्रीय विद्यालय असल्याने अडचणी येतात. जिल्ह्यात दोन केंद्रीय विद्यालये सुरू करावीत, अशी मागणीही केल्याचे सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. ते पूर्ण करण्याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी बुद्धिस्ट, हेरिटेज आणि कोस्टल सर्किट अंतर्गत गणपतीपुळे, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, मुरुड, दापोली, बाराशे वर्षांपूर्वीच्या कुडालेणी यांचा विकास करावा, तसेच सुधागड, तळा आणि मंडणगड येथील गड-किल्ल्यांना हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केल्याचे सांगितले.
अल्पसंख्याकांसाठी आणलेल्या नवीन धोरणामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खेलो इंडियाच्या माध्यमातून अलिबाग येथील जिल्हा संकुलात बहुउद्देशीय सभागृह, आॅलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव निर्माण करणे, तसेच रोहे, दापोली येथेही विकसित करण्यावर भर दिल्याचे सांगितले.
आयुषच्या माध्यमातून श्रीवर्धन येथे रुग्णालयाचा प्रस्ताव सरकारला सादर केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वर्ल्ड हेरिटेजमध्ये रायगड किल्ला यावा यासाठी युनेस्कोशी पत्रव्यवहार करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे आणि विनोबा भावे यांना भारतरत्न हा सर्वाेच्च किताब मिळाला आहे. या महान विभूतींचे एकत्रित स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे.