कोकणात केमिकल झोन आणण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:08 AM2018-01-19T01:08:26+5:302018-01-19T01:08:31+5:30

कोकणावर सातत्याने अन्यायच झाला आहे. निधी पुरेसा देण्यात आला नाही आणि आता जर नव्याने रिफायनरीज आणि केमिकल झोन येऊन येथील पर्यावरणाचा

Opposing the chemical zones in Konkan | कोकणात केमिकल झोन आणण्यास विरोध

कोकणात केमिकल झोन आणण्यास विरोध

Next

अलिबाग : कोकणावर सातत्याने अन्यायच झाला आहे. निधी पुरेसा देण्यात आला नाही आणि आता जर नव्याने रिफायनरीज आणि केमिकल झोन येऊन येथील पर्यावरणाचा -हास होणार असेल तर त्यास एक कोकणवासीय म्हणून माझा व्यक्तिगत विरोध असेल,अशी स्पष्टोक्ती राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे. प्लास्टिकबंदी राज्यात येत्या १८ मार्च गुढीपाडव्यापासून प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने कोकण महसूल विभागाची बैठक कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल मॅपल आयव्हीवाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कदम पत्रकारांशी बोलत होते.
अलिबाग नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडकरिता सरकारी जागा मिळवून देण्याकरिता मी आणि आमदार जयंत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सीआरझेडमधील बेकायदा बांधकाम कारवाईबाबत अनेक ठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही सारी प्रकरणे राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करून निवाडा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या दोन- तीन महिन्यांत हे निवाडे होतील आणि त्यानंतर आवश्यक ती कारवाई शासनाकडून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शासकीय भूमी संपादनाच्या वेळी संपादित जमिनीमध्ये कांदळवने आल्याचे स्पष्ट झाले असल्यास, याबाबत आपल्याकडे तक्रार आल्यास आपण कारवाई करू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यातील प्लास्टिकबंदीसाठी कायदा प्रस्तावित आहे. त्याद्वारे प्लास्टिकबंदी होण्याआधी जनजागृतीवर भर द्यावा, लोकांचे प्रबोधन करून प्लास्टिकबंदी व्हावी, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे. त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेण्याकरिता राज्यातील सर्व महसूल विभागात बैठका घेतल्या. आजची ही शेवटची कोकण महसूल विभागाची बैठक होती, असे कदम यांनी सांगितले. देशातील अन्य १७ राज्यांमध्ये प्लास्टिकबंदी आहे. राज्यात प्लास्टिकबंदीचा कायदा करण्याकरिता सर्व विभागीय पातळ्यांवर बैठकांचे आयोजन करून, अंमलबजावणी यंत्रणांशी विचारविनिमय व अधिकाºयांची व्यापक पातळीवर मते जाणून घेऊन तयार केलेला हा पहिलाच कायदा असेल, असे त्यांनी सांगितले.
येत्या १८ मार्च गुढीपाडव्यापासून राज्यात प्रस्तावित प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने कोकण महसूल विभागाच्या आयोजित या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, प्रभारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक होमणकर, ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी तसेच कोकण विभागातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी केले.

प्लास्टिकबंदीसाठी अधिकारी सकारात्मक असणे अपेक्षित
अधिकाºयांनी प्लास्टिकबंदी करण्यासाठी सकारात्मक विचाराने अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशा सूचना आपण दिल्या आहेत. बंदी करताना लोकांना प्लास्टिकऐवजी अन्य पर्याय देणे, प्लास्टिकबंदी करण्याबाबत प्रबोधन करणे, तसेच प्लास्टिकबंदीसाठी पुढाकार घेणाºया महापालिका, नगरपालिका आदींना प्रोत्साहनपर पारितोषिके देणे या पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले. कायदा होण्याआधीच लोकांमध्ये जनजागृती करून प्लास्टिकबंदी व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Opposing the chemical zones in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.