नागोठणे : जे.एस.डब्ल्यू. या खासगी कंपनीने जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासंदर्भात मौजे कोलेटी, कोलेटीवाडी, नागोठणे व शेतपळस येथील हद्दीत पाइपलाइन टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली असता, पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी संदर्भीय प्रत्रान्वये केलेल्या सूचनेनुसार या पाइपलाइनचे काम करण्यापूर्वी बाधित शेतकरी, तसेच एकता संघर्ष समितीशी चर्चा करण्यासाठी रोहे येथील उपविभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत समितीने या जलवाहिनीस प्रखर विरोध केल्याने हा प्रश्न सध्या प्रलंबितच राहिला आहे. रोहे येथे झालेल्या बैठकीत एकता संघर्ष समितीने महामार्ग रु ंदीकरणासाठी आमची जमीन दिली असून, कोणत्याही कंपनीला जलवाहिनी टाकण्यासाठी जमीन दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ज्या कारणासाठी जमीन संपादित केली जाते, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तिचा वापर करता येत नाही आणि आमची जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार नसल्याने या कंपनीची मक्तेदारी थांबवून जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत कामासाठी पोलीस बंदोबस्त किंवा कोणतीही परवानगी देऊ नये, असे निवेदनाद्वारे प्रांताधिकारी, रोहे यांना सूचित के ले आहे. कंपनीने या कामासाठी कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत याची माहिती मागताना जलवाहिनी टाकण्याबाबत भविष्यात होणारे नुकसान, सेफ्टी प्लॅन या संदर्भातील हमीपत्राच्या प्रतींची त्यात मागणी केली आहे. जे.एस.डब्ल्यू. या खासगी कंपनीकडून प्रांताधिकारी यांच्या समक्ष काही बाबी निदर्शनात आल्या. कंपनीने पाइपलाइनसाठी कुठलाही सरकारी धारा भरलेला नाही, तसेच तो भरण्याची आवश्यकताही नाही व कुठल्याही स्थानिक परवानगीची आवश्यकता नाही. अशी परवानगी कंपनीकडे आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सांगितले; परंतु परवानगी कोणती? याचा खुलासा यावेळी झाला नाही. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, जे.एस.डब्ल्यू.चे वरिष्ठ अधिकारी, तसेच बाधित शेतकरी उपस्थित होते.
जे.एस.डब्ल्यू.च्या जलवाहिनीला एकता संघर्ष समितीचा विरोध
By admin | Published: January 05, 2017 6:04 AM