अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र गेल्या ११ वर्षांत या ठिकणी कोणत्याच प्रकल्पाची साधी एक वीटही लावण्यात आलेली नाही. असे असताना सरकार आता नव्याने याच परिसरातील तब्बल एक हजार ८०० एकर जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकार आणि प्रशासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. आधी संपादित केलेल्या जमिनींवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली.याच परिसरामध्ये इंडोनेशियन कंपनी आपला प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येते. २००६-०७ साली अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि धेरंड परिसरामध्ये टाटाचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी परिसरातील तब्बल एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. जमिनीवरील लढाईसह कायदेशीर लढाई येथीस स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली लढली होती. पुढे टाटाला आपला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. त्यानंतर त्या जमिनी तशाच पडून होत्या. आता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही. प्रकल्प कोणता येणार याची माहिती नसताना सरकार प्रशासनामार्फत जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया कशी काय राबवू शकते, असा सवाल आता स्थानिक पातळीवरून विचारला जात आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिकांच्या बाजूने आता भाजपने उडी घेतली आहे.स्थानिकांचा आवाज बनण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी मंगळवारी राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. आधी संपादन केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी केली. या बाबतीत सरकारला अधिवेशनात जाब विचारावा, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी दरेकर यांना दिले. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे राकेश पाटील, भाजपचे अल्पसंख्याकाचे नेते आमीर खानजादा, संघर्ष समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.।प्रकल्पाबाबत स्थानिकांना कल्पना नाहीआता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही.
भाजपचा जमीन संपादनाला नव्याने विरोध, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:46 AM