पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नव्या मालमत्ता कर प्रणालीवरून विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:59 AM2021-03-23T01:59:02+5:302021-03-23T01:59:18+5:30
पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश; सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जात असल्याचा आरोप
पनवेल : पनवेल महानगरपालिकेची महासभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने सभेचे कामकाज सुमारे तासभर बंद होते. कोविडमुळे सध्याच्या घडीला ऑनलाइन सभेचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र ऑनलाइन सभेत सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नसल्याने विरोधकांनी पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश करीत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला मालमत्ता कराच्या नवीन प्रणालीनुसार नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. सुमारे ५ वर्षांचा एकत्रित कर नागरिकांना भरावा लागणार आहे. हा कर जादा असल्याने पालिका क्षेत्रात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरला आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मालमत्ता करावर चर्चा करीत नाहीत. ऑनलाइन महासभेत विरोधकांना म्यूट करून त्यांचा आवाज दाबला जात असल्याने शेकाप, महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश करीत सत्ताधारी भाजपचे निषेधाचे बॅनर सभागृहात फडकवले.
या वेळी पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चैतमोल यांच्यात व विरोधकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहावयास मिळाले. विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहातून बाहेर गेल्याशिवाय ऑनलाइन महासभेचे कामकाज चालू करणार नसल्याचे महापौर चैतमोल यांनी सांगितले. मात्र तरीदेखील विरोधक सुमारे तासभर सभागृहातच सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी देत होते. तासाभरानंतर ऑनलाइन सभेचे कामकाज सुरू झाले. या सभेत सिडको नोडमधील मैदाने व उद्यानांच्या विकासासाठी २२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त कळंबोलीमधील ६ ई मधील भूखंड क्रमांक २ वरील उद्यान आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली. खारघर गावातदेखील ११ कोटींच्या विकासकामांना या वेळी मंजुरी देण्यात आली.ऑनलाइन सभेत यापूर्वी पत्रकारांना वार्तांकन करण्यास पालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली होती. मात्र विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे पत्रकारांनादेखील सभेचे वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला.
ऑनलाइन सभेत आमच्या अनेक नगरसेवकांना म्युट करून त्यांना बोलू दिले जात नाही. वाढीव मालमत्ता कराच्या बाबतीत सत्ताधारी चर्चेस तयार नाहीत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही कोविडचे नियम पाळून पीपीई किट घालून सत्ताधाऱ्यांच्या निषेधासाठी हे आंदोलन केले. - प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका
सत्ताधाऱ्यांविरोधात काहीही बोलल्यास कारवाईची भीती दाखविली जाते. आम्ही कारवाईला घाबरत नसून पालिका क्षेत्रातील नागरिकांचे हित आमच्यासाठी सर्वस्वी आहे. - सतीश पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष