प्लास्टिकनिर्मिती कंपनीस विरोध; सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा जनआंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:47 PM2020-02-05T23:47:30+5:302020-02-05T23:47:53+5:30
मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात.
आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात. मुरुड तालुक्यात एकही प्रदूषण करणारा कारखाना नसल्याने मुरुड हा प्रदूषणमुक्त तालुका आहे. त्यातच प्लास्टिक निर्मिती करणारा कारखाना आला तर अशा कंपन्या आपले प्रदूषण करणारे पाणी समुद्राच्या खाडीत सोडतील, तर किनारपट्टीवरील असणाऱ्या राजपुरी व मांदाड खाडीवरील मच्छीमार यांच्यावर उपासमारीची पाळी येईल, यामुळे प्लास्टिकनिर्मिती करणाºया कंपनीस सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा विरोध असेल, असे संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमच्या संस्थेबरोबरच इतरही संस्थांचा तीव्र विरोध असल्याची माहिती या वेळी मनोहर मकू यांनी दिली.
मुरुड येथील सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेने दिघीपोर्ट येथे प्लास्टिकनिर्मिती करणाºया वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस विरोध केला आहे, असे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. यांची प्रत आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग, मुरुड तहसीलदार, मुरुड पोलीस ठाणे, मेरीटाइम बोर्ड, मुरुड, परवाना अधिकारी, पुरातन खाते यांना देण्यात आल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली. या कंपनीमुळे मुरुड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव, आगरदांडा या खाडीतील गावांमध्ये प्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होईल, तसेच त्याचे परिणाम मच्छीमारांना सोसावे लागणार आहेत. आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत सापडला आहे.
सातत्याने वाढणारे प्रदूषण त्यामुळे नष्ट होणाºया काही विशिष्ट माशांच्या प्रजाती एकंदरच परिणाम घटलेले उत्पादन शीतगृहाची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका कोळी बांधवांना बसला आहे. खाडीजवळच माशांचे पिल्ले तयार होऊन भरतीच्या वेळी समुद्रात जात असतात. ही मत्स्यप्रजननाची नैसर्गिक साखळी खाडीकिनारच्या औद्योगिक प्रदुषणामुळे तुटल्याने मुळात अपेक्षित प्रमाणात नैसर्गिक मत्स्यप्रजनन होत नाही. ही मोठी चिंताजनक बाब असताना पुन्हा दिघीपोर्ट या ठिकाणी प्रदूषण निर्माण करणारी वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट कंपनी येत असेल, तर या कंपनीला सर्व किनारपट्टीवरील कोळी बांधव कडाडून विरोध करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिली आहे.
या कंपनीमुळे कोळीबांधवांना वेठीस धरू नये, ही कंपनी आली तर मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होईलच, आधीच मच्छीमारांस मासे मिळत नाहीत, त्यांचा डिझेलचा खर्च भागत नाही. प्रदूषण निर्माण करणारी कंपनी आणून कोळीबाधवांवर अन्याय करु नका अशी मागणी के ली आहे.
परवानगी न देण्याची मागणी
या कंपनीचा प्रदूषणाचा परिणाम मानववस्तीवर होणार असून या कंपनीला येथे परवानगी देऊ नये, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जर कंपनी या ठिकाणी आली तर जिल्हातील सर्व कोळीबांधव एकत्र येऊन रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील, असा इशारा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिला आहे.