लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात उद्योगासाठी एम आय डी सी मार्फत हजारो एकर जमीन शेतकऱ्याकडून भूसंपदित केली आहे. मात्र शेतकऱ्याच्या जमिनी घेऊनही अनेक प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे ना रोजगार, ना विकास अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यात असताना बल्क औषध निर्मित शेतकऱ्यावर लादण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जात आहे. शेतकऱ्याचा बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध आहे. सक्तीने भूसंपादन केल्यास अधिकाऱ्यांना परिसरात फिरून देणार नाही असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी दिला आहे.
बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने ऍड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. अरुणकुमार वैद्य शाळेजवळ मोर्चा आला असता पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शेतकरी आणि एड महेश मोहिते यांनी आपली भूमिका भाषणातून मांडली. त्यानंतर एड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. मुरुड, रोहा परिसरातून शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
बल्क औषध निर्मित प्रकल्प हा रद्द झाला असला तरी राज्य सरकारतर्फे हा प्रकल्प होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मात्र या प्रकल्पाला येथील भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पात भूमिपुत्र याची घरे, शाळा, मंदिरे, जमीन जात आहे. त्यामुळे भूमिपुत्र देशोधडीला लागणार आहे. जिल्ह्यात एम आय डी सी तर्फे हजारो एकर जागा उद्योगासाठी घेतलेली आहे. मात्र त्यावर अद्यापही प्रकल्प उभे राहिलेले नाही आहेत. एम आय डी सी ही शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचा आरोप एड महेश मोहिते यांनी केला आहे. भूमिपुत्र याचा या प्रकल्पाला कायम विरोध असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. असे मोहिते यांनी म्हटले आहे.
तर चर्चा करण्यास तयार
उद्योगमंत्री याच्यासोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या चर्चेअंती सुटणार असतील आणि पर्याय मिळत असेल तर ठीक अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे एड महेश मोहिते यांनी म्हटले आहे.
उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांनी पूर्वीच्या प्रकल्पाबाबत अभ्यास करावा
उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनामार्फत बल्क औषध निर्मित प्रकल्प उभारला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र जिल्ह्यात अलिबाग, माणगाव तसेच इतर तालुक्यात प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी आजही प्रकल्पवीना पडुन आहेत. याबाबतचा अभ्यास पालकमंत्री यांनी आधी करावा असा टोलाही एड महेश मोहिते यांनी मारला आहे.