अलिबाग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दुपारपासून पावसाची दमदार सुरुवात, गणेश विसर्जनावर पावसाचे विघ्न
By राजेश भोस्तेकर | Published: September 23, 2023 12:58 PM2023-09-23T12:58:36+5:302023-09-23T12:58:56+5:30
सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाल्यानंतर सतत तीन दिवस पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू आहे. शनिवारी हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला असताना सकाळपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने शनिवारी २३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पाच दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला पावसाचे विघ्न असणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होताच पुन्हा पावसाने सुरुवात केली. सकाळी ऊन तर दुपारनंतर मुसळधार पाऊस अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात पावसाची आहे. हवामान विभागाने शनिवारी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडेल असे म्हटले होते. त्यामुळे सकाळी उन्हाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही तासात जिल्ह्यातील वातावरण पावसाळी होऊन मुसळधार पाऊस पडू लागला.
हवामान विभागाने शनिवारी ग्रीन अलर्ट जाऊन ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दुपार पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी पाच दिवसाच्या गणरायाचे गौरी सोबत विसर्जन आहे. त्यामुळे विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.