ऑरेंज अलर्ट! घराबाहेर पडताना जपून; चार दिवस बरसणार
By निखिल म्हात्रे | Published: July 12, 2024 05:51 PM2024-07-12T17:51:00+5:302024-07-12T17:51:34+5:30
वीकेंडवर पावसाचे पाणी पडणार?
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जाेरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. ही संततधार १६ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. हवामान विभागानेही ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असल्याने वीकेंडवर पावसाचे पाणी पडणार आहे.
जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे भात लावणीची कामे वेगाने सुरू आहेत. मागील दोन ते तीन दिवस ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. शुक्रवारी पहाटे जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. तर, जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला.
हवामान विभागाने पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सतर्कता बाळगावी लागणार आहे. तर, हा वीकेंड घरात व्यतीत करावा लागणार आहे.
चौल बायपासवर वृक्षाचा गतिरोधक
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे चौल बायपास येथील भलेमोठे झाड रस्त्यातच कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली असून, झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम स्थानिकांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजतापर्यंत पडलेला पाऊस
अलिबाग - ९१, पेण - ५५, मुरुड - ५० मि.मी., पनवेल - ७८, उरण - ३९, कर्जत - ६३, खालापूर - ४५, माणगाव - ३२, रोहा - २६, सुधागड - ४६, तळा - ५८, महाड - २७, पोलादपूर - १५, म्हसळा - ३१, श्रीवर्धन - २३, माथेरान - ८६.