फरार गिरिधरला न्यायालयात हजर करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:25 AM2019-04-17T00:25:11+5:302019-04-17T00:25:18+5:30
गिरिधर नथू भदाणे हा न्यायालयीन कोठडीत असताना तात्पुरत्या जामिनावर गेल्या २४ जुलै २०१७ रोजी दहा दिवस मुदतीकरिता मोकळा झाला होता.
अलिबाग : बाललैंगिक अत्यचार गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी व मोस्ट वॉण्टेड म्हणून घोषित गिरिधर नथू भदाणे हा न्यायालयीन कोठडीत असताना तात्पुरत्या जामिनावर गेल्या २४ जुलै २०१७ रोजी दहा दिवस मुदतीकरिता मोकळा झाला होता. त्यास ३ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणे गरजेचे असताना तो हजर न राहता फरार झाला होता, तो आजपर्यंत फरार आहे. गिरिधर नथू भदाणे व काजल जैन यांचा शोध घेऊन मुंबई उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले .
मुरुड येथील विजय जैन यांची बेपत्ता मुलगी काजल जैन (२६) हिचा विवाह कर्नाटक राज्यातील मुधोळ येथील अमित ओसवाल यांच्याशी डिसेंबर २०१६ मध्ये झाला. गिरिधर नथू भदाणे याने काजल हीस तिच्या मुधोळ ेयेथील सासर वरुन १४ आॅगस्ट २०१७ रोजी पळवून नेले आहे. पोलीस तपास यंत्रणेद्वारे फरार आरोपी व काजल जैन यांचा शोध चालू आहे. फरार गिरिधर नथू भदाणे व काजल विजय जैन यांचे फोटो रायगड पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. या दोघांबाबत कोणाकडे काही माहिती उपलब्ध असल्यास ती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.