नेरळ : नेरळ-कळंब मार्गावर परवानगी न घेताच, धोकादायकरीत्या वीजखांब उभारल्याबद्दल कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने सूर्या सर्व्हिसेस या कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच सदर रस्त्यालगत वीजखांब उभारण्याची व केबल टाकण्याची परवानगी दंडात्मक कारवाईसह रद्द करण्यात यावी, अशी विनंती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल यांना केली आहे.काही दिवसांपूर्वी नेरळ-कळंब राज्यमार्ग क्र मांक १०९ वर महावितरण यांनी रस्त्यालगत विजेचे खांब बसविण्यास सुरु वात केली आहे. हे विजेचे खांब रस्त्याला लागूनच असल्याने अपघाताची शक्यता असल्याने पोशीर ग्रामस्थ आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. काही ग्रामस्थांनी कर्जत महावितरणच्या कार्यालयात जाऊन येथील उप अभियंता आनंद घुले यांची भेट घेतल्यानंतर ही वीजवाहिनी एका खासगी गृहप्रकल्पासाठी जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील एका खासगी प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अधिकारीदेखील कंबर कसून कामाला लागले असल्याचे दिसून आले.रस्त्याच्या साइडपट्टीवर विद्युत खांब उभारण्याचा घाट घातल्याने नागरिकांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती. सदर काम प्रगतिपथावर असताना पोशीरमधील काही जागरूक ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप घेतल्याने अधिकाऱ्यांची सारवासारव सुरू झाली. सदर काम हे एका खासगी गृहप्रकल्पाकरिता सुरू असल्याची कबुली अधिकाºयांनी दिली. विशेष म्हणजे, कुठलेही भूसंपादन न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमार्गालगत खांब उभारणी व केबलकरिता परवानगी मागणारे पत्र महावितरणच्या पनवेल कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांना पाठवण्यात आले. परवानगी मिळणारच अशी खात्री असल्याने त्याआधीच विद्युतखांब रस्त्यालगत उभारायला या ठेकेदार कंपनीने सुरु वात केली. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सूर्या सर्व्हिसेस कंपनीला नोटीस जारी केली आहे. तसेच सदर परवानगी दंडनीय कारवाईसह रद्द करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास विनंती केली आहे.
पोशीरमधील धोकादायक वीजखांब काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:22 PM