दासगाव : तीन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रामधील क्रिप्टझो कारखाना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. या कारखान्यांबरोबरच महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकरणारे तीन कारखानेही बंद करण्याच्या नोटिसा प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या आहेत. महाड उप प्रादेशिक प्रदूषण कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली असून, त्यानुसार या कारखान्यांचे पाणी व वीजपुरवठा तातडीने बंद करावा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रामधील क्रिप्टझो या कारखान्यामध्ये १५ नोव्हेंबरला झालेल्या सिलिंडर स्फोटांमध्ये तीन कामगारांचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला तर इतर १४ कामगार भाजल्याने त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही हा कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महाडच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कारखान्यांमध्ये हवा प्रदूषण, ज्वालाग्राही पदार्थ नियमावली याचा आधार घेत हा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कारखान्यातील वीजपुरवठा बंद करण्याबाबत वीज कंपनीला तर पाणीपुरवठा बंद करण्याबाबत एमआयडीसीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने लेखी कळवलेले आहे. या कारखान्याबरोबरच महाड औद्योगिक वसाहतींमधील केमसॉल, ओम केमिकल व पॅनारोमा केमिकल या तीन कारखान्यांनाही प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून बंदची नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारखान्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात जल व वायुप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मंडळाकडे आल्या होत्या. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे पाऊल उचलले. यामुळे प्रदूषण करणाºया महाडमधील कारखान्यांना चांगलीच चपराक बसली आहे.बंदच्या दिल्या नोटीसाक्रिप्टझो कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर महाडमधील तीन कंपन्यांनाही बंदच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याबाबत संबंधित विभागांना नोटीस प्रत पाठवून कळवण्यात आलेले आहे.- सागर औटी, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड
स्फोटानंतर क्रिप्टझोसह चार कारखाने बंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 6:24 AM