सातमुशी नाल्यावरील बांधकाम थांबविण्याचे आदेश
By admin | Published: December 16, 2015 12:53 AM2015-12-16T00:53:31+5:302015-12-16T00:53:31+5:30
तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ वर्षे जुन्या असलेल्या सातमुशी नाल्यावर कोणत्याही शासकीय विभागांची आणि ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृत
रोहा : तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ वर्षे जुन्या असलेल्या सातमुशी नाल्यावर कोणत्याही शासकीय विभागांची आणि ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या येथील एका बिल्डरला बांधकाम थांबविण्याचे आदेश रोहा तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रोहा शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्वत:च्या फायद्यासाठी आरसीसी स्लॅब टाकण्याचे काम येथील एका बिल्डरने सुरु केले आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास निवी ठाकुरवाडीपासून ते कळसगिरीच्या डोंगरकपारीतून पावसाळ्यात वाहणाऱ्या मोठ्या नाल्यातील पाणी अडून त्याचा त्रास वरसे, भुवनेश्वरसह विभागातील शांती नगर, एकता नगर, आदर्शनगर, हरी ओम, प्रियदर्शनी, मिलन या इमारतींमधील रहिवाशांना होतो. पावसाळ्यात येथे भयानक अशा आपत्तीचा प्रश्न निर्माण झालेला असतो. वरील ठिकाणी कंबरभर पाणी साचून नागरिकांना पाण्याच्या सामना करावा लागतो आहे. हा नाला कायमस्वरुपी उघडा ठेवण्यात यावा तसेच मूळ नाल्याची रुंदी कायम ठेवण्यात यावी यासाठी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार रोहा, गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक वरसे यांना निवेदन दिले आहे. वरसे ग्रामपंचायतीने या बिल्डरला काम थांबविण्याचे आदेश देऊनही नाल्याच्या ठिकाणी मोठे स्लॅब टाकण्याचे काम बिल्डरने चालूच ठेवले होते. कोणतीही शासकीय परवानगी नसताना होत असलेल्या या अनधिकृत बांधकामाकडे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी रोहा तहसीलदार ऊर्मिला पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तलाठी व ग्रामसेवक वरसे यांना तातडीने या नाल्यावर होत असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
या नाल्यावर स्लॅब टाकल्यास येथील नागरी वसाहती पावसाळ्यात पूर्णपणे बुडण्याची भीती आहे. हा नाला कायमस्वरुपी उघडा ठेवण्यात यावा तसेच मूळ नाल्याची रुंदी कायम ठेवण्यात यावी. सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याचे तेथील रहिवासी नंदकुमार राक्षे, एस. पी. सोनावणे, भास्कर कदम यांनी सांगितले असून तहसीलदार रोहा यांनी वरील आदेश दिल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, तसेच जुन्या नाल्याला संरक्षण कठडे बांधल्यास मुलांच्या सुरक्षिततेचा विषय मार्गी लागेल, असे नागरिकांनी सांगितले आहे.
नैसर्गिक नाल्यावर नगररचना विभागाची रीतसर बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कुणीही कुठल्याही प्रकारचे बांधकामे करु नयेत. तसे बेकायदेशीर बांधकाम करणे एक शासकीय अपराध असून कायदेशीर कारवाईस ते पात्र राहतील यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- ऊर्मिला पाटील,
तहसीलदार, रोहा.
या विभागातील पाण्याचा पावसाळ्यात पूर्णत: निचरा होत नसल्याने ३-४ वर्षांपूर्वी बेंडा कॉम्प्लेक्स येथून पर्यायी नाला बांधण्यात आला आहे. हा नालाही अतिशय उथळ असल्याने त्याचा प्रवाह देखील सातमुशी नाल्याकडेच वळला जातो. या सर्वांचा भार या सातमुशी नाल्यावर येतो. त्यामुळे पावसाळ्यात भयानक परिस्थिती येथे कायम उद्भवत असते. या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
- जितेंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते