- जयंत धुळप, अलिबागसेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात गेल्याने मानवीशरीर अनेक रोगांचे माहेरघर बनत आहे. पनवेल तालुक्यातील गुळसुंदा येथील मिनेश गाडगीळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रायोगिक संशोधनाद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. वनस्पतीजन्य व काही प्राणिजन्य पदार्थ तसेच काही नैसर्गिक घटक यांचा उपयोग करुन या सेंद्रिय खताची निर्मिती होते. या संशोधनासाठी ‘भारत सरकारने’ पेटंट देऊन गाडगीळ यांना गौरविले आहे .ही सेंद्रिय खत निर्मिती पूर्णत: देशी-बनावटीची, विषविरहित शेतीमाल उत्पन्न करणारी असून त्याचा योग्य वापर केल्यास,शेती उत्पादनात १५ टक्के ते ५० टक्के उत्पादन वाढ घडवून यश प्राप्त झाले आहे. उत्पादित शेतीमाल शुध्द,सकस होऊन त्याचा आकार व वजन देखील वाढते. याचा उपयोग आजवर सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळझाडे, भाज्या-पालेभाज्या, औषधी वनस्पती, फुलझाडे, कापसासारखी इतर पिके यावर अत्यंत यशस्वी झाला असून, प्रगतिशील उत्पादक शेतकरी आणि बागायतदार यांनी त्याचा नियमित वापर सुरु केला असल्याचे गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेंद्रिय खतात ‘भूसुधारक’ व ‘वृक्षसुधारक’ असे दोन विशेष प्रकार असून दोहोंच्या नियमित वापराने किडींचा प्रादुर्भाव शंभर टक्के रोखला जातो. जमिनीचा पोत सुधारतो आणि वनस्पतींची रोग प्रतिकारकशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. हे खत घन व द्रव अशा स्वरूपात असून जमिनीत तसेच फवारणी स्वरूपात दिले जाते. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असून ते वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माणया खतामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॅल्शियम, आर्यन व आॅरगॅनिक कार्बन सिलिका इत्यादी मूलद्रव्ये असल्याने उत्पादित धान्य ,फळे, फुले यांची प्रत सुधारते. कार्बोहायड्रेट, फॅट प्रोटीन व फॅटी अॅसिड यासारख्या घटकांमुळे वनस्पतीची वाढ उत्तम होऊन निर्माण होणारा शेतीमाल उत्तम दर्जाचा होतो. ही सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माण केलेली आहेत. जमिनीतून आणि फवारणीद्वारे दिले जाणारे हे सेंद्रिय पध्दतीचे खत आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा संशोधक गाडगीळ यांनी केला आहे.
सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान
By admin | Published: December 15, 2015 12:54 AM