नागोठणे - स्थानिक कंपन्यांमध्ये १०० टक्के स्थानिक मराठी तरुणांना काम मिळाले पाहिजे, हे मनसेचे धोरण आहे. बाजूच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांत नोकरीबाबत काय धोरण चालू आहे, याचा अभ्यास करून येथील मोठ्या कंपन्यांमध्ये माथाडींना न्याय देण्याचे संघटनेने काम करावे, असा सल्ला मनसेचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात उघडण्यात आलेल्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. लोकांना समजून घेऊन काम केले तर यश निश्चितच मिळते. नागोठण्यात उघडलेले रायगड जिल्ह्यातील हे पहिले कार्यालय आहे. जिल्ह्यात आपल्या माथाडी संघटनेची आणखी कार्यालये कशी वाढतील, यासाठी आजपासूनच कामाला लागावे, असा सल्ला नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी माथाडी संघटनेकडून नांदगावकर यांना या व्यवसायात महत्त्वपूर्ण समजला जाणारा माथाडींचा ‘हुक’ यावेळी भेट देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांमध्ये ८० टक्के परप्रांतीय माथाडी कामगार काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ८० टक्के स्थानिक माथाडी कामगार या कंपन्यांमध्ये कसे जातील, यासाठी लवकरच लढा देणार असल्याचे राजन शितोळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, माजी आ. प्रकाश भोईर, संघटनेचे अध्यक्ष अरविंद गावडे, कार्याध्यक्ष सुमंत तारी, राजेश उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, प्रदेश सरचिटणीस राजन शितोळे, देवेंद्र गायकवाड, महेश पंडित, सागर चाळके, राजेश शाह, संघटनेचे रोहे तालुका अध्यक्ष विनायक तेलंगे, उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तोंडातून निघालेले शब्द हे बाण असून, गोडीने बोलून लोकांची मने जिंकावीत, असा सल्ला नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.
स्थानिकांना न्याय देण्याचे काम संघटनेने करावे - बाळा नांदगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:56 AM