ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 09:55 PM2022-12-11T21:55:30+5:302022-12-11T21:56:42+5:30
रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : मागील वर्षी उत्खननात सापडलेली दोन टनांपर्यंत वजनाची आणि साडेसात फूट लांबीची एक शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना एकवटल्या आहेत. रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे.
मागील वर्षी बांधकामासाठी खोदकाम करताना द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी खोदकाम सुरू असताना अचानक एक ऐतिहासिक तोफ सापडली होती.शिवकालीन पुरातन असलेली तोफ सात फूट लांबीची आणि दोन टनांपर्यंत वजनाची आहे.ही ऐतिहासिक शिवकालीन तोफ मागील वर्षभर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डाऊरनगर येथील शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती.पुरातन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे धुळखात पडून राहिलेली ही ऐतिहासिक तोफ जतन करण्याची गरज आहे.शिवकालीन इतिहास युवा पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी द्रोणागिरी किल्ल्यावरच तोफ स्थानापन्न करण्याची आवश्यकता असल्याची बाबही येथील शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांच्या लक्षात आली.
उरण तालुक्यातील सुमारे दहा शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून ऐतिहासिक वारसा असलेली शिवकालीन तोफ काहीही, कसंही करून द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यावर एकमत झाले आणि रविवारी (११) प्रत्यक्षात सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे कामालाही सुरुवात केली. दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविणे साधे काम नसल्याचे माहिती असतानाही युवा शिवप्रेमींनी रविवारी जिद्दीने कामाला सुरुवात केली.
आधी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सींच्या जोरावर दोन टन वजनाची ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे.शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ दुपारी चार वाजेपर्यंत डोंगराच्या मध्यावर पोहचविण्यात शिवप्रेमींना यश आले आहे.विसाव्यानंतर पुन्हा एकदा शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे. द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.