दासगाव : महाराष्ट्र शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेची माहिती देण्याकरिता मंगळवारी दासगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शासनाची ‘आमचा गाव आमचा विकास’ ही योजना राज्यभरात सुुरू झाली आहे. या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणे, गाव नकाशे बनवणे, महिला सभा घेऊन विकासात्मक योजना राबवणे, गावाचा आराखडा तयार करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायती च्यावतीने दासगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मशाल फेरी, सीमा फेरी आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्या विनिता चांढवेकर, सरपंच प्रज्ञा खैरे, उपसरपंच परवेझ अनवारे, विजय चांढवेकर, सदस्य दुर्गेश शिंदे, किशोर जाधव, वर्षा दासगावकर, शलाका मिंडे, विस्तार अधिकारी एम. बी. सातव, मुख्य प्रवर्तक किरण शिरगावकर, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी, शासकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. दासगावातील महिला, पुरुष तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमानुसार २८ जुलै रोजी ग्रामपंचायतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)दासगावमधील दरडग्रस्तांना श्रद्धांजली : ‘आमचा गाव आमचा विकास’ रॅलीच्या निमित्ताने दासगावातील २६ जुलै २००५ मधील दरडग्रस्तांना श्रद्धांजली वाहिली. ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यक्रमानुसार २८ जुलै रोजी ग्रामपंचायतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तेव्हा ग्रामस्थांनी या सभेला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
दासगावमध्ये ‘आमचा गाव आमचा विकास’ रॅली
By admin | Published: July 27, 2016 3:09 AM