रायगड - ५० वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, रोहा येथील दिंड्या पंढरीची वारी करत आहेत. कोरोना संकटामुळे प्रथमच त्यांच्या वारीला जाण्यामध्ये खंड पडला आहे. माउलीची भेट होणार नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यांमधून प्रत्येकी एक अशा १५ दिंड्या निघतात. एका दिंडीमध्ये किमान ६०० माणसे असतात. या सर्व नोंदणीकृत दिंड्या आळंदीला एकत्र येतात. तेथून पुढे रायगडची दिंडी अशी ओळख मिळते. या दिंडीसाठी ५० नंबरचा क्रमांक आहे.पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावाजगावर आलेल्या महामारीच्या संकटामुळे आमचा पांडुरंगही देवळात बंदिस्त झाला आहे. आषाढ महिन्यात त्याच्यासोबतच्या भेटीची ओढ आम्हाला लागली आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे प्रथमच आम्हाला वारीला जाता येत नाहीय. शालेय जीवनापासून मी वारीचा आणि माउलीच्या भेटीचा आनंद लुटत आलो आहे.
विठ्ठलाची भेट होणार नसल्याने आमच्यावर दुखद प्रसंग ओढवल्याची जाणीव होते. वारीला जाताना पांडुरंग हा आमच्यासोबत चालत असतो. त्यावेळी तो देवळात नसतो. तारणहार तोच आहे. तोच रक्षीले आम्हा, करू आम्ही पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावा, अशी पांडुरंगाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. -ह.भ.प.विद्याधर महाराज निळकर, अलिबागकोरोनामुळे आमची वारी हुकलीवारीला जाताना विठू माउली नेहमीच आमच्यासोबत चालत असते. त्यामुळे कधीच थकवा अथवा कंटाळा येत नाही. आज कोरोनासारख्या रोगाने आमची वारी हुकली आहे. वारीला जाता न येणे हे दु:ख फक्त विठ्ठलाच्या भक्तालाच समजू शकते. त्याच्या भेटीची वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहत होते. आज भेटीचा योग आला होता, तो मात्र कोरोनामुळे ढळला आहे. पांडुरंगाची भेट न होणे हे दु:ख फार मोठे आहे. वर्षातून एकदा माउलीचे दर्शन होणे म्हणजे प्रत्यक्ष भेटीची अनुभूती असते. आता मनातूनच पंढरीला पाहोेचून माउलीला दंडवत करते. माउलीला एवढेच साकडे आहे की, जगावरील कोरोनाचे संकट तत्काळ दूर कर. -पवित्रा सिंगासने, वारकरीपाडुरंगाची भेट न झाल्याने अतीव दु:खजगावर आलेले कोरोनाचे संकट हे न भूतो न भविष्यती असेच आहे. याच संकटामुळे आमची पांडुरंगासोबतची भेट रखडली आहे. पांडुरंगाशी इतके एकरूप झालो आहोत की, डोळे मिटल्यावर त्याचेच दर्शन होते. पांडुरंग आणि भक्तांचे नाते फार महान आहे. भक्तांच्या हाकेला तो नेहमी धावतो. त्याच्या दर्शनाने सर्व दुख, नैराश्य, थकवा सर्व एका चुटकीसरशी निघून जातात. आयुष्यात पहिल्यांदा वारी हुकल्याचे आणि पांडुरंगाची भेट न झाल्याचे अतीव दु:ख होत आहे. ऊन, वारा पाऊस याची कसलीही तमा न बाळगता वारकरी वारीत सामील झालेला असतो. वाटेत अनेक संकटे येतात. मात्र, प्रत्येकाच्या मनामध्ये माउलीच्या भेटीची ओढ लागलेली असते. त्यामुळे सर्व संकटे तुडवत आम्ही देवाच्या चरणी लीन होतो. देवाने जगावरील संकट दूर करावे. -ह.भ.प. मारुती महाराज कोल्टकर, रोहामाझी माउली कोसो दूरमाझी माउली माझ्यापासून कोसो दूर आहे. वारीला जाण्याची उत्कंठा सातत्याने लागलेली असते. डोळ्यात पांडुरंगाचे रूप साठवून ठेवले, तरी ते कमीच वाटते. याची देही याची डोळा, अशी भेट होणे हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा असतो. मात्र, या वर्षी तसे घडणार नसल्याने मनाला फार वेदना होत आहेत. मी कधी पायी दिंडीत सामील झाले, तर कधी वाहनाचा वापर केला. मात्र, पायी दिंडीत असणारे वातावरण मन प्रसन्न करणारे असते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पांडुरंगाच्या भेटीची ओढ दिसून यायची. विठू माउलीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या वर्षी भेट झाली नसली, तरी पुढल्या खेपेला नव्या जोमाने जाणार असल्याने भेटीची ओढ कायमच राहणार आहे. -हेमलता भगत, वारकरी