दिघी: श्रीवर्धन महावितरणकडून वीजबिल तक्रार समस्या निवारणीसाठी ४ आणि ५ सप्टेंबरला विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्राहकांना वाढीव वीजबिल देयक नसल्याची माहिती या शिबिरात देण्यात आली. मात्र, या शिबिरात सरासरी वीजबिल कमी न झाल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी दिसून आली.
तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील कुडगाव, हरवीत, दिघी, कर्लास, नानवेल, वडवली, शिस्ते, कापोली, कुडकी, भावे व बोर्लीपंचतन येथील वीज ग्राहकांसाठी विजाबिलाबाबत समस्या निवारण्यासाठी श्रीवर्धन महावितरणकडून दोन दिवस बोर्लीपंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महावितरणच्या आवाहनानुसार हजारो ग्राहकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये रीडिंग नसलेलं वीजबिल, शिवाय वीजबिलाचे स्लॅब नसून सरासरी बिल असल्याची तक्रार वीज ग्राहकांकडून करण्यात आली. याच कारणासाठी बोर्लीपंचतन विभागातील जवळजवळ ४० गावांना श्रीवर्धनच्या महावितरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अनेक तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपअभियंता महेंद्र वाघपैंजन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वायडे, अश्विनी लांगी, श्रीराम मुंडे, अमोल मोरे आदी श्रीवर्धन महावितरण अधिकारी व कर्मचारी शिबिरात उपस्थित होते.
रीडिंग बिल आले नसेल, अशा ग्राहकांना या महिन्यात रीडिंगनुसार बिल मिळेल. रीडिंग उपलब्ध वीजबिलावरील देयक हे स्लॅबनुसार येईल. वापरलेल्या विजेनुसार वीजबिल आकारण्यात येईल. हे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच समस्यांचे निवारण केले जाईल. - महेंद्र वाघपैंजण,
महावितरण उपअभियंता श्रीवर्धन
रीडिंग वीजबिलावरील आकारणी स्लॅबनुसार नसल्याने सरांसरी वीज देयक आकारण्यात आले आहे. यामुळे वाढीव बिल समस्येचे निवारण झाले नाही. - विश्वास तोडणकर, वीज ग्राहक बोर्लीपंचतन