श्रीवर्धन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:20 PM2019-10-16T23:20:58+5:302019-10-16T23:21:13+5:30

रोजगारनिर्मितीवर लक्ष कें द्रित :शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, पर्यटनवृद्धीसाठी करणार काम

This is the overall development of Shrivardhan constituency | श्रीवर्धन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

श्रीवर्धन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

Next

श्रीवर्धन : २००९ पूर्वीचे श्रीवर्धन सर्वांना ज्ञात आहे. १९८० साली बांधलेले रस्ते, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, शून्य अवस्थेत असलेले पर्यटन व शिक्षणातील मागासपणा या सर्व बाबींवर खासदार सुनील तटकरे यांनी लक्ष दिले. मला त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा आहे. माझ्या विचारांना कर्तृत्वाची जोड देत नवीन सक्षम व समृद्ध श्रीवर्धन घडवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली कामे, शून्य अवस्थेतील पर्यटन आज फुलत आहे. मला त्या पर्यटनाला चालना देत श्रीवर्धनला जगाच्या पाठीवर एक समृद्ध विभाग म्हणून नावलौकिक मिळवून द्यायचा आहे. निसर्गाने दिलेल्या संपत्तीचा वापर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी करायचा आहे. मी श्रीवर्धन मतदारसंघातील कन्या आहे. मी येथील जनतेचे प्रश्न मार्गी लावणार आहे. स्थानिक पातळीवर लोकांच्या रोजगारात वाढ झाल्यानंतर मुंबईस्थित जनतेला पूर्ववत गावाकडे आणण्याचा प्रयत्न मी कसोशीने करणार आहे, असे महाआघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी सांगितले.


पर्यटनाच्या माध्यमातून
विकास कसा साधणार?
श्रीवर्धन मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पर्यटनास पोषक आहे. अथांग सागर, उंच डोंगर, अभिमानी ऐतिहासिक वारसा याची देण श्रीवर्धनला मिळाली आहे. आजमितीस रस्ते विकासाला चालना दिल्यास मुंबई-पुणे या ठिकाणावरून नियमित पर्यटक श्रीवर्धनला येत असतो. त्याचसोबत वर्षा सहली, शैक्षणिक संस्थांच्या सहली संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे येतात; त्यासाठी रस्ते विकास गरजेचा आहे. पर्यटनामुळे स्थानिक जनतेला चांगला रोजगार उपलब्ध होईल याची खात्री आहे. दिवेआगार, हरिहरेश्वर, दिघी, श्रीवर्धन शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेने पर्यटनपूरक भूमिका घेतली आहे. त्याचा फायदा पर्यटनास चालना देण्यासाठी होत आहे. आणखी प्रयत्न पर्यटन विकासासाठी करणार आहे.


श्रीवर्धनमधील उद्योगास
कशी चालना देणार?
श्रीवर्धन मतदारसंघात पर्यटनपूरक उद्योगास चालना मिळणे अगत्याचे आहे. पर्यावरणाचा ºहास होणार नाही व त्याचा परिणाम पर्यटनावर होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. केमिकल प्रकल्प आल्यास त्याचा त्रास सर्वांना होईल, त्यासाठी आम्ही आमच्या अभ्यासगटाच्या माध्यमातून अगोदर येणाऱ्या प्रकल्पाचे पूर्णपणे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करून त्या संदर्भात निर्णय घेऊ. जनतेचा विकास हेच आमचे ध्येय आहे.


शिक्षणाच्या विकासासाठी
काय भूमिका असेल?
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण गरजेचे आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विकासासाठी योग्य व दिशादर्शक शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न असेल. श्रीवर्धन शहरात मुलींसाठी एसएनडीटी शाखा सुनील तटकरे यांनी या पूर्वीच आणली आहे. आता मी मतदारसंघात पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले प्रशिक्षण निशुल्क उपलब्ध करून देणार आहे. मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणास पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.


पिण्याच्या पाण्याची समस्या
कशी दूर करणार?
गेल्या वर्षी संपूर्ण मतदारसंघातील लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या वेळी सर्वोतोपरी साह्य केले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या नात्याने दुष्काळग्रस्त गावांना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली. पेयजल योजनेच्या माध्यमातून अनेक गावांचा पाणीप्रश्न निकाली काढला आहे. मतदारसंघात सदैव शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल, त्यासाठी योजना तयार आहे.


शेतीसाठी काय योजना आहेत?
आपली शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. आपण विशेषत: भाताचे पीक घेतो. महाराष्ट्राच्या इतर विभागाच्या तुलनात्मकदृष्ट्या कोकणात पर्जन्यमान जास्त आहे; परंतु लाल मातीचा पोत जास्त काळ पाणी साठवून ठेवत नाही. त्यामुळे भातशेतीसोबत इतर वार्षिक पिके घेणे शक्य नाही; परंतु मी स्वत: त्यासंदर्भात शेती तज्ज्ञांशी चर्चा केली आहे, त्यानुसार आपण सहामाही पीकनिर्मिती करू शकतो. मी आमदार झाल्यावर तत्काळ शेतीसंदर्भातील विचारांना कृतीची जोड देणार आहे. येथील शेतकरी सुखी व समृद्ध होईल तो दिवस मी माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल.

Web Title: This is the overall development of Shrivardhan constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.