कर्जतच्या नवसूची वाडीमधील ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 10:54 PM2020-01-16T22:54:50+5:302020-01-16T22:55:00+5:30

श्रमदानातून नदीवर बांधला बंधारा : प्रादेशिक बंदर विभाग, अलिबाग कार्यालयाचा पुढाकार

Overcome water scarcity of villagers in Navsuchi Wadi of Karjat | कर्जतच्या नवसूची वाडीमधील ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

कर्जतच्या नवसूची वाडीमधील ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

Next

कांता हाबळे 

नेरळ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका म्हणजे आदिवासी बहुल भाग असलेला तालुका आहे. तेथीलच एक आदिवासीवाडी म्हणजे नवसूची वाडी. या भागात उन्हाळा सुरू झाल्यावर पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे ठाकते. या पाणीटंचाईवर उपाययोजना शासनस्तरावरआजवर होऊ शकलेली नाही, त्यामुळे येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रादेशिक बंदर विभाग अलिबाग यांनी पुढाकार घेत नदीवर ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नवसूची वाडी हे गाव साधारण डोंगराळ भागात असून, साधारण १०० ते २०० घरांची वस्ती येथे आहे. गावातील कुटुंबाला शेती सोडून रोजगाराचे इतर काही साधन नाही. पावसाळ्यात शेतीमध्ये भाजीपाला, तांदूळ असे काहीतरी पिकवायचे आणि त्यावर पुढचे आठ महिने काढायचे. इतर वेळी भाजीपाला पिकवायला शेतीला पाणीच नाही, त्यामुळे मोलमजुरी शिवाय पर्याय नाही. तीही कायम नसते. कष्ट व मेहनत करण्याची जिद्द असलेल्या येथील लोकांना सरकारची मात्र साथ नाही. त्यामुळे कसातरी उदरनिर्वाह करायचा. येथील महिला मोहाची फुले वेचून ती सुकवून १० ते २० रुपयांना विकून दोन पैसे जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, शासनाला आणि येथील पुढारी लोकप्रतिनिधींना याचे सोयर सुतक नाही.

नवसूची वाडी गावाजवळून खांडस येथून उगम पावणारी धार नदी वाहते. मात्र, नदीचे पाणी हे एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण आटते. तेव्हा पुढील दोन महिने मे व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू होते. प्रामुख्याने येथील महिलांना दोन ते तीन किलोमीटर इतरत्र जाऊन पाणी डोक्यावरून आणावे लागते, याचा तेथील महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. या गावाच्या लोकांचा रोजगार हा मोलमजुरी असून स्थानिकांचे हे दोन महिने प्रामुख्याने महिलांचे पाणी भरण्यात जातात. घरातील एक सदस्य पूर्ण वेळ घरी राहिल्याने त्याचा परिणाम त्या घरातील रोजगारावरही होतो. ही जाण असलेल्या व गावातून शिकून सध्या प्रादेशिक बंदर विभाग, अलिबाग येथे बंदर निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महेश लक्ष्मण होले हे गावातील या परिस्थितीने व्यथीत झाले होते. तेव्हा आपल्या वरिष्ठ, सहकारी व ग्रामस्थ यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी श्रमदान करून नदीवर बंधारा बांधण्याचा निश्चय केला.

नवसूची वाडी येथे अडवलेले पाणी आता पाइपलाइनने गावापर्यंत नेऊन ते गावात पोहोचविण्याचा आपला पुढील मानस असल्याचे बंदर निरीक्षक महेश लक्ष्मण होले व वारे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कमळू कांबडी यांनी सांगितले आहे. या श्रमदान उपक्रमात आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू कॅप्टन अजित टोपणो, अलिबाग बंदर निरीक्षक कार्यालयाचे बंदर निरीक्षक महेश होले, समीर बारापात्रे, अमर पालवणकर, लिपिक आशिष सानकर, अजय चव्हाण, लेखापाल शैलेश खोत, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कमळू कामडी आदीसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते.

लोकसहभागातून धारा नदीवर बंधारा
बंधाºयामुळे नदीचे पाणी अडवून साठा केल्यास त्याचा फायदा पाळीव प्राणी व इतर वन्य प्राण्यांनासुद्धा होणार आहे. तसेच यातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पनासुद्धा लोकसहभागातून व श्रमदानातून पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रादेशिक बंदर विभाग कार्यालय, अलिबाग यांच्यासह नवसूची वाडी, हºयाची वाडी व कुरुंग येथील २०० ग्रामस्थांनी श्रमदान करत धार नदीवर बंधारा बांधून पूर्ण केला आहे.
आमच्या गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते, शासनाचे टँकर येतात; पण ते पुरत नाहीत. त्यामुळे गावातील महिलांना मैलोन्मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागते. आमच्या गावातील अधिकारीपदावर काम करणारे महेश होले यांनी श्रमदानाची संकल्पना आम्हाला सांगितली. त्यानुसार गावातील नदीवर आम्ही श्रमदानातून बंधारा बांधला आहे. त्यामुळे नदीतील लवकर आटणारे पाणी आता जास्त दिवस आम्हाला वापरता येईल, अशी आशा आहे. या श्रमदानाच्या कल्पनेतून आम्ही पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. - भास्कर दोरे, ग्रामस्थ नवसूची वाडी

नवसूची वाडी येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. येथील महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर बाहेर जावे लागते, हे चित्र बदलण्याचा संकल्प आम्ही केला आणि ग्रामस्थांशी बोलून त्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानातून बंधारा बांधण्याची संकल्पना आज पूर्णत्वास आली आहे. माझे मित्र, सहकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शासनाची ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम आम्ही येथील नवसूची वाडी येथे राबवली आहे. त्याप्रमाणे माझे इतर मित्र आहेत तेही उच्च पदावर कार्यरत आहेत, त्या सर्वांना सांगितले, तेव्हा सर्वांना कल्पना आवडली; त्यांनीही यासाठी श्रमदान केले. - महेश होले, बंदर निरीक्षक, अलिबाग

Web Title: Overcome water scarcity of villagers in Navsuchi Wadi of Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी