ऑक्सिजन प्रणाली, अग्निसुरक्षेचे ऑडिट, रुग्ण सुरक्षेला प्राधान्य द्या - पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:01 AM2021-04-24T01:01:28+5:302021-04-24T01:01:36+5:30
जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : नाशिकला झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीपाठाेपाठ विरारमधील रुग्णालयात घडलेल्या आगीच्या गंभीर दुर्घटनेमुळे सर्वांचाच थरकाप उडाला आहे. रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन आणि आगीच्या व्यवस्थापनाचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाशिक आणि विरारसारखी दुर्घटना आपल्या जिल्ह्यात हाेऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. बहुतांश रुग्णालये खचाखच भरून गेली आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असताना मृतांच्या आकड्यानेही आता उसळी घेतली आहे. रुग्णांवर उपचार करण्याचे शिवधनुष्य आराेग्य विभाग जेमतेम पेलत आहे. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची दमछाक हाेताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची फार माेठी किंमत माेजावी लागू शकते. याची जाणीव सरकार आणि प्रशासनाला आहे. त्याचाच भाग म्हणून अलिबाग, पनवेल, माणगाव आणि महाड येथील रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीचे ऑडिट करण्यात येत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी 'लाेकमत'ला सांगितले. त्याचप्रमाणे विरारसारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये. यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणांपासून तातडीने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाेलीस यंत्रणेनेही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असे स्पष्ट केले.
रायगडच्या जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील; तसेच सर्व संबंधितांना आवश्यक ते आदेश जारी करतील, असेही तटकरे यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा हाेरपळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन सर्तक झाले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्र येथील फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,
- निधी चाैधरी, जिल्हाधिकारी