कर्जत : तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालू असलेल्या अॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पामार्फत दिशा केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस गती येणार आहे. तालुक्यातील प्रशिक्षित आशा वर्क र या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. तालुक्यातील चाळीस गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत कुपोषित मुले, पालक यांचे पोषण व आरोग्य सेवेबद्दल जनजागृती केली जाणार आहे, या जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले यांच्या हस्ते करण्यात आले. येथील शबरी संस्थेच्या सभागृहात २६, २७ आणि २८ या तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात कुपोषित मुलांचे पोषण, कुपोषित मुलांना आरोग्य सेवा देणे, गरोदर व स्तनदा मातांना चौरस आहार देणे, कुपोषणाच्या श्रेणी निश्चित करून तीव्र कुपोषित मुलांना संदर्भसेवा देणे या बाबींविषयी माहिती देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या अरुणा हरपुडे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सोयी संस्था पुणेचे विनोद शेंडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणात चाळीस गावांतील अशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. कॅन प्रकल्पाचे तालुका समन्वयक अशोक जंगले, रवी भोई आदी उपस्थित होते.काय आहे कॅन प्रकल्प?कम्युनिटी अॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्प आदिवासी उपाययोजनेतील चाळीस गावांतील अंगणवाडीत ० ते ६ वयोगटांतील मुलांची आरोग्य तपासणी करणे, वजन-उंची घेणे, वजन-उंचीनुसार तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित, तीव्र कमी वजनाचे, मध्यम कमी वजन व वाढीतील घसरण या पाच श्रेण्या निश्चित करण्यात येतात. या पाच श्रेणींतील मुलांचा पाठपुरावा करणे, मुलांना आरोग्य व पोषण सेवा उपलब्ध करून देणे, कुपोषण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हा हेतू या मोहिमेचा आहे. अशा प्रकारे कॅ न प्रकल्प राबवला जातो.
पोषण, कुपोषण निर्मूलन मोहिमेला येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:30 PM