पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:19 AM2020-12-12T02:19:17+5:302020-12-12T02:19:35+5:30

- सिकंदर अनवारे   दासगाव : ऐतिहासिक पाचाड गावात असलेल्या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राला समस्यांच्या विळखा पडला आहे. गेली ...

Pachad Primary Health Center in the grip of problems | पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

Next

- सिकंदर अनवारे
 
दासगाव : ऐतिहासिक पाचाड गावात असलेल्या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राला समस्यांच्या विळखा पडला आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी शासकीय खर्च होत असला, तरी हा खर्च वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. येथे बंद दूरध्वनी, पाणीटंचाई, भंगार वाहन, मोडकळीस आलेल्या कर्मचारी वसाहती अशा अनेक समस्यांना येथील कर्मचाऱ्याना तोंड द्यावे लागत आहे.

ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र गेली अनेक वर्षांपासून आहे. पाचाड, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणी वाडी, पुनाडे, सांडोशी, सावरट, कोंझर, कोथुर्डे, वाळसुरे, छत्री निजामपूर आदी गावातील ग्रामस्थांना या ठिकाणी आरोग्य सुविधेचा लाभ घेता येतो. महाडजवळील मांडले, नाते, तळोशी, नांदगाव, वरंडोली या गावांसह ३४ गावे आणि १०२ वाड्यांचा या प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींनाही याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा होत आहे. या परिसरात खासगी दवाखाने नसल्याने गरोदर महिलांनाही प्रसूतीसाठी याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार मागणी होऊनही याबाबत शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. यामुळे स्थानिक रुग्णांना पदरमोड करून महाड शहरात उपचारासाठी यावे लागते. रायगड परिसरातील डोंगर दऱ्या-खोऱ्यातील गावांतील रुग्णांना बाळंतपण, आजार, अपघात, लसीकरण, डाॅटची औषधोपचार, कुत्रा-साप-विंचू दंशावर उपचारासाठी हेच एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र सोईचे आहे. 

या भागात दुसरी कोणतीही वैद्यकीय सेवा नसल्याने गडावर येणारे लाखो पर्यटक व या भागातील नागरिकांसाठी हा एकमेव दवाखाना आहे.
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी आहे. गेली अनेक वर्षे या इमारतीवर खर्च केला जात आहे. त्या जागेत तडजोड करत येथील कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. वारंवार केलेला खर्चही निकृष्ट कामामुळे वाया गेलेला आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी विजेच्या वायर जळल्या गेल्याने भिंतीवरील काळा रंग तसाच लागून आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या प्रसूतिगृहाचीही तीच अवस्था आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी असलेल्या खाटांचीही दुरवस्था आहे. 

कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी या ठिकाणी निवासस्थानांची सुविधा आहे. यापूर्वी असलेले कौलारू निवासस्थान वादळात गेल्याने नव्याने बांधण्यात आलेली निवासस्थाने अवघ्या काही वर्षांतच मोडकळीस आली आहेत. निवासस्थानांचे दरवाजे तुटून नुकत्याच झालेल्या वादळात छपरांचेही नुकसान झाले आहे. वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने महिला कर्मचारी किंवा महिला डॉक्टर यांना ही निवासस्थाने असुरक्षित असल्याचे डॉ.पी.एस.बेर्लेकर आणि सृष्टी शेळके यांनी सांगितले. 

पिण्याच्या पाण्याची समस्या कायम
या प्राथमिक आरोग्यकेंद्राला स्वत:ची पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या केंद्राला ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जानेवारी महिन्यानंतर पाचाड या ठिकाणी पाणीटंचाई भासू लागते. सद्या नळपाणी योजनेला आठवड्यातून एकदाच पाणी येत आहे. पाणी मिळत नसल्यामुळे दवाखान्यातील शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. ऐन मार्च महिन्यापासून पाण्याअभावी रुग्णांना ॲडमिटही करता येत नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना महाड या ठिकाणी जावे लागत आहे. 

वाहनाची झाली दुरवस्था 
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या वाहानाचीही दुरवस्था झाली आहे. येथील वाहन हे १०२ रुग्णवाहिका असल्याने आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आणि महिलांना ने-आण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यापूर्वी खर्च केलेला आहे. मात्र, कर्मचारी निवासस्थानाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरिता आपण जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणार असून, निधी प्राप्त होताच काम केले जाईल.
    – संजय कचरे, जिल्हा परिषद सदस्य 

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध देखभाल दुरुस्तीबाबत आपण प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, निधी प्राप्त होत नसल्याने कामे रखडली आहेत. 
    – नरेंद्र देशमुख, प्रभारी अभियंता जिल्हा 
परिषद बांधकाम विभाग महाड
 

Web Title: Pachad Primary Health Center in the grip of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.