पेणमध्ये समाधानकारक पावसाने भातशेती बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:41 AM2018-08-02T04:41:49+5:302018-08-02T04:42:05+5:30
खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे.
पेण : खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे लागवडीखालील भातपिकांना अनुकूल हवामान लाभल्याने पेणच्या १३ हजार १०० हेक्टर क्षेत्राच्या शिवारात भातपिकाने चांगलंच बाळसं धरून भातपीक वाऱ्यावर स्वच्छंदपणे हिंदोळत आहे. एकंदर या वर्षीचा खरीप हंगाम उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या शासनाच्या संकल्पनेनुसार आशादायक चित्र शिवारात निपजल्याने शेतकरीवर्गात आनंदी वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.
उत्तम शेती व श्रमजीवी शेतकरी असल्याने या वर्षीचा खरीप हंगाम शेतीसाठी पॉवरफुल्ल ठरला आहे. जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस सतत राहिल्याने जुलै महिन्याच्या २० तारखेपर्यंत त्याने नित्यनियमाने आपले कर्तव्य बजावले. पेणमधील एकंदर पावसाची परिस्थिती पाहता तब्बल २२०० मि.मी. पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. सरासरी पाऊस ३००० मि.मी. एवढा पडतो. मात्र, गतवर्षी ४४०० मि.मी. पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने या वर्षीचा प्रारंभी जून आणि जुलै महिन्यात चांगला वर्षाव केला आहे. यावर्षी १२ हजार ८०० हेक्टरवर प्रारंभी लागवड झाली. त्यानंतर खारभूमी क्षेत्रातील ५०० हेक्टर क्षेत्र पुनर्वसू व पुष्य नक्षत्रामध्ये पूर्णपणे लागवडीखाली आल्याने १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले. यावर्षी खते, बी-बियाणे, कीडनाशक, औषधांची वेळेवर मात्रा मिळाल्याने शासन व शेतकरी यांच्यामध्ये योग्य प्रकारे कम्युनिकेशन झाले. पाऊस लागवडीयोग्य असाच पडल्याने शेतीच्या लागवडीची कामे हवामान वेळेवर पूर्ण करता आली.
या वर्षी कृषी उत्पादन भात बियाणे कंपन्यांची सुधारित व संकरीत प्रजातीच्या वाणांची पेरणी झाली असून, नर्सरी भाताच्या रोपांची सतत पडणारा पाऊस व थंड हवामान, अशी अनुकूल वातावरण निर्मिती झाल्यामुळे लागवड झालेल्या रोपांना वेळेत खतांची मात्रा मिळाल्याने शिवारात पिकांनी चांगलेच बाळसं धरले आहे. जुलै महिन्याच्या अखेरच पावसाची दमदार एन्ट्री होऊन सरासरी ७५ टक्के पाऊस झाल्याने येणाºया आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत हीच रोपे फुटवा करून सशक्तपणे जोमदार होऊन कीडरोगाला बळी न पडता, उत्तम प्रकारे गर्भधारणेस तयार होऊन शिवारात आशादायक चित्र निपजेल. त्यातून उन्नत शेती व समृद्धीचे शिवार पाहावयास मिळेल, अशी शेतकरी बांधवांची आशा- आकांक्षा आहे. सध्या तालुका कृषी विभाग कीड रोग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती शेतकरी बांधवांना देत आहे. यासाठी कृषी सहायक गावोगावच्या शिवारात निरीक्षण करीत असल्याचे पेण कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी सांगितले.