माणगावमध्ये भातशेती झाली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:55 PM2019-08-08T23:55:07+5:302019-08-08T23:55:15+5:30
एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही.
माणगाव : सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगडसह कोकणातील शेतकºयांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र आता लपून राहिलेले नाही. एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे. प्रचंड मेहनतीने उभी भातशेती निसर्गाच्या या कोपाने आडवी झाली आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आता दुबार पेरणी करणे अशक्य आहे. त्यामुळे या वर्षी हाती काहीही उरणार नाही. झालेल्या नुकसानीचे सरकारने मोजमाप करावे, अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. शासनाने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणा जलदगतीने कार्यरत करावी असे चित्र सुस्पष्ट आहे. अतिपावसामुळे डोंगर माथ्यावर असलेली शेती काही प्रमाणात तग धरू शकते; परंतु भात पांढरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जी शेती उताराच्या सखल भागात आहे, ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सततच्या पाण्यामुळे तीही पूर्णपणे आडवी (झोपली) झाली आहे. या सर्व नुकसानीचे रीतसर पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.