आगरात भातशेतीचा असा झाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:39 AM2018-02-21T01:39:07+5:302018-02-21T01:39:10+5:30
तालुक्यातील पेझारी येथील नादीरशा बारीया हे त्या काळी शहापूर-धेरंडमधील ७०० एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते
जयंत धुळप
अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथील नादीरशा बारीया हे त्या काळी शहापूर-धेरंडमधील ७०० एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते; परंतु आज त्यांचे कोणीही वंशज येथे नाहीत. शहापूरला पोयनाड येथील मारवाडी, सावकार तसेच पेझारी येथील पारशी यांनी मजुरी देऊन जमिनीचे कोठे तयार के ले,नंतर त्याचे भाग करून, त्याच मजुरांना शेती कसायला दिली आणि येथील आगरात भातशेतीचा प्रारंभ झाला. आगरीत भातशेती करणारे ते आगरी अशी तत्कालीन शेतमजुराची संज्ञा निश्चित झाली. आज या आगºयांची शहापूरला सातवी पिढी कार्यरत असल्याची माहिती ९६ वर्षीय शहापूर ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच शांताराम महादेव भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
आगºयांच्या सात पिढ्यांच्या कष्टातून आताचे एकूण ३५०० एकर भातशेती क्षेत्र तयार झाले आणि धोया कोठा, नानी, बेडी, ठाकुर्ली, धोय, लहरी, मांडलेशील सरखार, मोरा, खर्नय, अंगर भोय, भंगार कोठ्यात यामध्ये विभागले असून, प्रत्येक कोठ्याचा स्वतंत्र जागृत देव आहे. या ३५०० एकर भातशेती क्षेत्रापैकी एकट्या नादीरशा बारीया (पेझारी) पारशी समूहाची ७०० एकर भातशेती शहापूर (अलिबाग)मध्ये होती. नादीरशा बारीया एकरी १२ मण भात स्वत:ला व ८ मण भात ती शेती प्रत्यक्ष कसणाºया कुळाला देत असे. यामध्ये कसणाºयांनीच त्याच्या वाट्याला आलेली समुद्रकाठची संरक्षक बांधबंदिस्ती करायची, असे बंधनकारक असायचे. आजच्या सातव्या पिढीलादेखील ते बंधनकारक आहे. बारीया यांच्या नावाने पेझारी येथे प्राथमिक शाळा आहे. सध्या पेझारीमध्ये धुमाळ यांच्या घरापुढे गेले की पेझारी गावात नादीरशा परशांच्या वाड्याचे जमीनदोस्त झालेले काही अवशेष पाहायला मिळत असल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.
१९२६ साली या ७०० एकर मालकी असलेल्या नादीरशा बारीया यांनी ज्या जमिनी शहापूरच्या शेतमजुरांना मक्त्याने दिल्या होत्या व त्यामध्ये एकरी २० मण भात पिकते, असे गृहीत धरून सावकाराला १२ मण व कसणाºया मजुराला ८ मण, असा समझोता करार असतानादेखील अचानक त्यांनी ‘ढेपी मक्ता’ सुरू केला. ढेप म्हणजे ‘ढेकूळ’ त्यावर येणारे सर्वच पीक पारशाला द्यायचे असा मक्ता सुरू केला. त्यावर ७०० एकरच्या कुळांनी एकमुखी निर्णय घेऊन एक वर्ष संप केला. त्या वेळचे शेतकºयांचे नेते केशव भगत, गोविंद भगत, महादेव मढवी, गोविंद पाटील, बटू पाटील, बाळू पाटील, पोशा तांडेल यांनी प्रतिनिधित्व करून संपाची मागणी १०-१०अशी केली. २० मण एकरी भात पिकेल, त्यातील अर्धे कुळाला व अर्धे सावकाराला म्हणजे समन्यायी वाटपाची मागणी व ज्याला ग्रामीण भाषेत ‘अर्धल’ म्हटले जाते. ही ‘अर्धली’ची मागणी चरीच्या संपाच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात शहापूरच्या शेतकºयांनी प्रथम केली. जोपर्यंत ‘अर्धल’ मिळत नाही तोपर्यंत शेती कसणार नाही असा निर्णय पारशाला सांगण्यासाठी जाण्याचे ठरवल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.