- सिकंदर अनवारे
दासगाव : गेली काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी अचानक हजेरी लावली. या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. दासगावमध्ये भातशेतात पाणी साचल्याने उभे पीक आडवे झाले आहे, तर अनेक ठिकाणी कापलेल्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने भात कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून आॅक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण होते. मात्र, ऐन दसºयाच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आॅक्टोबरच्या उष्णतेमध्ये भात पीक कापणीयोग्य झाले आहे.तालुक्यात काही भागात भाताची रोपे कापून उडवी देखील रचली गेली आहेत. काही भागात भात पीक कापणी सुरू झाली आहे. याच दरम्यान पाऊस पडल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे.दासगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कापलेल्या आणि उभ्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने नुकसान होणार आहे. भात पिकाची मळणी करून उरलेल्या भागाचा पेंढा गुरांचे खाद्य म्हणून वापरला जातो. मात्र, हा पेंढा देखील भिजल्याने यामध्ये बुरशी किंवा कुजण्याची शक्यता आहे. भाताचे धान भिजल्याने त्यातून बाहेर पडणारा तांदूळ देखील खराब होण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. रचलेल्या उडव्यांमध्ये असलेला भात कुजण्याआधी शेतकºयांना पुन्हा बाहेर काढून उन्हात सुकवावा लागणार आहे. तालुक्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने भात पीक कापणीला देखील अडथळा निर्माण झाला आहे.भात कुजण्याची, गळण्याची भीतीमहाड तालुक्यात दासगावप्रमाणेच रायगड, विन्हेरे, बिरवाडी आदी परिसरात देखील पाऊस पडला. या भागात रिमझिम पाऊस पडला असला तरी या पावसाने या परिसरातील देखील भात पीक खराब होणार आहे. या भागात देखील भात पीकच घेतले जात असल्याने या पिकावर पडलेल्या पावसाने भात गळून पडण्याची शक्यता आहे.या परिसरात देखील भाताच्या लोंब्या शेताच्या पाण्यात आल्याने या लोंब्याचे नुकसान होणार आहे. महाड तालुक्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूलकडून होणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विमा योजनेतून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.