नेरळ : हस्त नक्षत्रातील पाऊस हा सर्व शेतकऱ्यांसाठी नेहमी संकट घेवून येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील सध्या सुरू असलेले हस्त नक्षत्र आपले रूप दाखवून बळीराजाची चिंता आणखी वाढवत आहे. वादळी वाऱ्यासह येत असलेल्या सोसाट्याच्या पावसाने शेतातील भाताची रोपे पडत आहेत. कर्जत तालुक्यातील किमान अर्धी भाताची रोपे शेतात कोसळली असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या संकटात आणखी भर म्हणजे सध्या सुरु असलेला पाऊस ७ आॅक्टोबरपर्यंत थांबणार नाही असे वेधशाळा सांगत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाचे बदललेले रूप आता अधिक धोकादायक स्वरूप धारण करताना दिसत आहे. आधीच बळीराजा पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत असतो, त्यात आता आणखी भर पडत आहे. यंदा चार महिन्यात पाऊस कमी आणि सूर्यप्रकाश जास्त अशी स्थिती पावसाळा असून देखील पहायला मिळाली होती. त्यानंतर गणपती येण्याआधी पडलेल्या पावसामुळे किमान भाताचे पीक हाती येईल अशी शक्यता निर्माण झाली. पूर्वी हस्त नक्षत्रातील पाऊस हा सलग सर्व भागात दररोज लागून राहत नसे, जिकडे होईल तिकडे नुकसान करण्याचा हस्त नक्षत्राचा नेहमीचा दिनक्र म यावेळी नवीन पायंडा घालताना दिसत आहे. यावेळी २७ सप्टेंबरला सुरूझालेले हस्त नक्षत्र आपले रंग सर्व भागांना दाखवताना दिसत आहे. त्याने येतानाच वादळी वाऱ्याची सोबत घेतली असून विजांचा कडकडाट ही सोबतीला आहेत.कर्जत तालुक्यातील भाताचे पीक हस्त नक्षत्रातील पावसामुळे धोक्यात येताना दिसत आहे. भाताच्या शेतात उभे असलेले रोप हे भाताच्या लोंब्यामुळे अधिक वजनदार झाले आहे. त्यामुळे साधा वारा आला तरीही ते खाली कोसळण्याची भीती असते. मात्र वादळी वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील अर्धे अधिक भाताची रोपे जमिनीवर कोसळली आहेत. त्यानंतर पावसाने आपली संततधार कायम ठेवल्याने शेतकऱ्याच्या मनात अधिक भीती निर्माण झाली आहे. पाऊस आणखी आठ दिवस असाच कोसळत राहिल्यास शेतात पडलेल्या भाताला पुन्हा नवीन कोंब फुटू शकतात. त्यामुळे हाती येणारे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताचे पीक पावसाळ्यात घेतले जाते. (वार्ताहर)
पावसाने भातपिकाचे नुकसान
By admin | Published: October 05, 2015 12:33 AM