आदिवासी क्षेत्रात भात खरेदी केंदे्र सुरू होणार
By admin | Published: November 23, 2015 01:26 AM2015-11-23T01:26:15+5:302015-11-23T01:26:15+5:30
आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१५-१६ आदिवासी उपाययोजना क्षेत्रात प्रादेशिक व्यवस्थापक,
अलिबाग : आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०१५-१६ आदिवासी उपाययोजना क्षेत्रात प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय जव्हार यांच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कशेळे व पाथरज भात खरेदी केंद्रावर, तर बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को.आॅप.मार्केटिंग फेडरेशन यांच्या अधिपत्याखालील जिल्हा मार्केटिंग रायगड या अभिकर्ता संस्थेमार्फत रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड, कर्जत तालुक्यात भात खरेदी केंद्रावर भात खरेदी करण्यात येणार आहे. अ श्रेणी भातासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण भातासाठी १४१० रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत राहाणार आहे.
भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ३१ आॅक्टोबर २०१५च्या शासन निर्णयानुसार खरीप पणन हंगाम १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ व रब्बी पणन हंगाम १५ मे २०१६ ते ३० जून २०१६ पर्यंत असल्याचे नमूद केले आहे. भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीचा सातबाराचा उतारा आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे सातबाराच्या उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र, या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी), पिकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन भरडधान्य खरेदी करण्यात येईल. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले परंतु खरेदी न झालेले भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहणार आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या विनिर्देशात बसणारे एफ.ए.क्यू. दर्जाचेच धन, भरडधान्य ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण १७ टक्के असल्याची खात्री करु नच खरेदी करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)